बारामतीत अतिक्रमणांवर फिरला जेसीबी

पदपथांसह रस्ते, चौकांनी घेतला मोकळा श्‍वास : एमआयडीसीतही कारवाई

बारामती – बारामती शहरातील रस्त्यांच्या कडेला झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेने बुधवार (दि. 19) पासून पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. चौक, पदपथ, रस्त्यांच्या कडेला केलेल्या अतिक्रमणांवर जेसीबी फिरवण्यात आला. तसेच छोट्या-मोठ्या स्वरुपाची अतिक्रमणेही काढण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्ते, पदपथ, चौकांनी किमान आज तरी मोकळा श्‍वास घेतला होता. तर एमाआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी देखील एमआयडीसी चौकातील अतिक्रमणांवर आज जेसीबी फीरवला.

बारामती शहरातील मुख्य रस्ते, पदपथ तसेच चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे शहरातील रहदारीला अडथळा ठरत आहेत. त्यामुळे शहराला विस्कळीतपणा आला आहे. ही बाब लक्षात घेऊन बारामती नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. शहरातील अतिक्रमणे हा वर्षांनूवर्षे अधिकाऱ्यांच्या डोक्‍याला ताप ठरलेला विषय आहे. अतिक्रमणांवर अनेकवेळा जुजबी स्वरुपाची कारवाई केली जाते. नंतर काही दिवस गेली की परिस्थिती “जैसे थे’ होते. वाढत्या अतिक्रमणांमुळे मात्र, समस्या वाढल्या असून त्या दूर करण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा कंबर कसली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवत असताना कोणाचे नुकसान होणार नाही, अशी नगरपरिषदेची भूमिका आहे. मात्र, कोणी अतिक्रमण काढण्यास विरोध केला, तर त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारी नगरपरिषदेने दर्शवली आहे.

अतिक्रमण विभागाचे राजेंद्र सोनवणे, सुनिल धुमाळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी या मोहीमेत सहभागी झाले आहेत. शहरातील छोटे तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. जाहिरातींचे बोर्ड, साड्या नेसवून कापड दुकानाबाहेर उभारण्यात आलेले पुतळे आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण मोहीमेत सातत्य ठेवण्यात येणार आसून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचे राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

या ठिकाणी केली कारवाई
शहरातील इंदापूर चौक, श्रीगणेश मंडई समोर, गुणवडी चौक तसेच नवीन वाहनतळासमोरील अतिक्रमणे नगरपरिषदेने काढली. तर एमआयडीसी चौक ते सुभद्रा मॉलपर्यंतची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली.

“आमचे हातावरचे पोट आहे साहेब’…
शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करीत असताना टपरीधारकांनी कारवाईस विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधास न जुमानत कारवाई सुरुच होती. “आमचे हातावरचे पोट आहे साहेब, टपऱ्यांचे नुकसान करू नका’, अशी विनवणी छोट्या विक्रेत्यांनी यावेळी केली. असे असले तरी एमआयडीसी परिसरातील टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्या. कारवाईच्या दुपारच्या सत्रापर्यंत इंदापूर चौक परिसरातील 27 टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

बारामती शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवण्यात येणार आहे. शहरातील रहदारीची समस्या सोडवली जाईल. अतिक्रमणाच्या बाबतीत छोटा-मोठा असा भेदभाव केला जाणार नाही. कारवाईच्या बडग्यातून बडे व्यापरी देखील सुटणार नाहीत यापुढील काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील.
– योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद

Leave A Reply

Your email address will not be published.