दादागिरी रोखण्यासाठी उपाययोजना : पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली चालणार कामकाज
दैनंदिन कामाची थेट आयुक्तांना माहिती
या सेलमध्ये औद्योगिक पट्ट्यातील कंपनी व्यवस्थापन, कामगार आणि अन्य उद्योजकांना कोणत्या स्वरूपाचा त्रास झाल्यास “इंडस्ट्रियल रिलेशन सेल’ त्यासाठी काम करणार आहे. शहरात सध्या कार्यरत असलेल्या खंडणी / दरोडा प्रतिबंधक विभागाकडे “इंडस्ट्रियल रिलेशन सेल’ची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तसेच या सेलसाठी अधिकारी देखील नेमला जाणार असून, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या सेलच्या कामकाजाबाबत लक्ष ठेवणार असून थेट पोलीस आयुक्तपद्मनाभन यांना दैनंदिन माहिती देणार आहेत.
पिंपरी – उद्योगनगरी म्हणून राज्यभरात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाढलेले औद्योगिक वसाहतींला माफियांची नजर लागली आहे. उद्योगनगरीमध्ये माफियांचा वाढता धुमाकूळ आणि युनियनच्या नावाखाली होत असलेली दादागिरी आणि अवैध वसूली थांबविण्यासाठी अखेर पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भयमुक्त उद्योगांसाठी आता “इंडस्ट्रीयल रिलेशन सेल’ ची स्थापना करण्यात येणार आहे. हे पथक थेट पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करणार आहे.
पिंपरी, भोसरी, चिंचवड, तळवडे, तळेगाव आणि चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली माफियांच्या धुमाकूळ वाढला आहे. या माफियांमुळे परदेशी कंपन्या हैराण झाल्या आहेत. विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधी आणि वाणिज्यिक दुतांनी याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे देखील केली होती. दुसरीकडे स्थानिक औद्योगिक संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून औद्योगिक परिसरातील गुंडगिरी थांबविण्याची मागणी करत आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये जर्मनीचे कॉन्सुलेट जनरल डॉ. यूर्गन मोरहार्ड यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन माफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. अखेर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण औद्योगिक पट्ट्यातील दाखल गुन्ह्यांचा आणि घडणाऱ्या घटनांचा तुलनात्मक आढावा घेतला होता. कंपनीच्या एचआर आणि ऍडमिन डिपार्टमेंटला येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी चाकण, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाणे स्तरावर बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते.
पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करताना शासनाने दिलेल्या आदेशावर बोट ठेऊन मंजुरी वेळेसचे कर्मचारी पिंपरी-चिंचवडला वर्ग करण्यात आले होते. मात्र, हे करताना ग्रामीण पोलीस दलाने चाकण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व्यतिरिक्त शहर पोलीस दलातील पिंपरी, भोसरी व चिंचवड पोलीस ठाण्यातील अतिरिक्तकर्मचारी काढून घेण्यात आले. यामुळे आयुक्तालय सुरू झाले आणि पोलीस कमी झाले अशी परिस्थिती नव्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात निर्माण झाली. यावर देखील आयुक्त पद्मनाभन यांनी तोडगा काढून औद्योगिक पट्ट्यासाठी सुरू असलेल्या पोलीस ठाण्यांना अतिरिक्तमनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. आता कंपन्याच्या सुरक्षेसाठी त्यापुढे जाऊन आता कंपन्यांसाठी “इंडस्ट्रियल रिलेशन सेल’ ची स्थापना करण्यात येणार आहे.