-भारताच्या अभियानाला आजपासुन सुरूवात
-लागोपाठ तिसरा पराभव टाळण्याचे आफ्रिकेपुढे आव्हान
-रोहित आणि शिखरच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा
साऊदॅम्प्टन – 12व्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरूवात भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्याद्वारे करणार असुन पहिल्याच सामन्यात विजय मिळवत सकारात्मक सुरूवात करण्यास भारतीय संघ उत्सूक आहे. तर, स्पर्धेतील लागोपाठ तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर असणार आहे.
विश्वचषक स्पर्धेला 30 मे रोजीच सुरूवात झाली असली तरी भारतीय संघाचा पहिला सामना आज म्हणजे 5 जुन रोजी होत असुन इतर संघांचे एक-दोन सामने होवून गेल्याने भारतीय संघाला आपल्या अभियानाची सुरूवात उशिराने करावी लागत असतानाच भारतीय संघाला सुरूवातीलाच कठीण पेपर सोडवावा लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील संभाव्य विजेते समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघाने आतापर्यंत केवळ एक वेळाच विश्वचषक सामना जिंकलेला आहे.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघ म्हणुन ओळखला जातो आहे.
स्थळ – रोझ बाऊल मैदान, साऊदॅम्प्टन
वेळ – दु. 3.00 वा
कारण भारतीय संघात उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच संघातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांना विश्वचषक स्पर्धेपुर्वीच लय गवसली असल्याने भारतीय संघ समतोल आणि बलाढ्य झाला आहे. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत आपले पहिले दोन्ही सामने गमवावे लागल्याने त्यांचा संघ चांगलाच दबावात सापडलेला असुन त्यांच्यावरील दबावाचा फायदा भारतीय संघ कशा प्रकारे उचलतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या संघला सध्या दुखापतींनी वेढलेले असल्याने त्यांच्या समोरील अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला हेल्मेटवर चेंडू आदळल्याने जायबंदी झाला होता. तर, दुसऱ्या सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी जायबंदी झाला असल्याने या सामन्यात त्या दोघांच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच प्रमुख वेगवान गोलंदाज डेल स्टेनला जायबंदी असल्याने विश्वचषक स्पर्धेतून मुकावे लागले आहे.
यावेळी आफ्रिकेच्या दृष्टीने समाधानकारक बाब म्हणजे सलामीवीर डी कॉक आणि कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस हे दोघेही लयीत असतानाच मधल्याफळीतील डेव्हिड मिलर आणि रसी व्हॅन डर दुसे देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांचा संघ मोठे लक्ष्य उभा करण्याची अथवा पाठलाग करण्याची शक्यता ठेवतो.
तर, दुसरीकडे विश्वचषकापुर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये भारतीय संघाचे सलामीवीर अपेक्षित कामगिरी करण्यास अपयशी ठरले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यातच लोकेश राहुलने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शानदार शतकी खेली साकारल्याने भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजा मोठा प्रश्न सुटला असला तरी आपला फॉर्म कायम राखण्याचे आव्हान त्याच्या समोर असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.
दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.