चिंतन : महापुरुषांचा पराभव?

-सत्यवान सुरळकर

जगात अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांना त्यांच्या देशात तसेच पूर्ण जगात सन्मान दिला जातो. भारतात जन्मलेल्या महापुरुषांच्या वाट्याला मात्र ही सन्मानाची वागणूक आलेली दिसत नाही. येथील महापुरूष वेगवेगळ्या गटाने किंवा जातीने वाटून घेतला आहे. आमचा महापुरुष किती महान आहे हे सांगताना दुसऱ्या महापुरुषांवर चिखलफेक केली जाते. मात्र यामध्ये खरेतर आपण आपल्याच महापुरुषांचा पराभव करायला निघालो आहोत.

भारतातील अनेक महापुरुष नावारूपाला आले. त्याची कीर्ती जगभर पसरली. त्यांना जगाने स्वीकारले मात्र, भारतातच त्यांचा स्वीकार करण्यात आलेला नाही. या महापुरुषांपैकी डॉ. बाबासाहेब यांचे नाव अग्रस्थानी येईल. बाबासाहेब आंबेडकरानी घटना समितीच्या शेवटच्या अधिवेशनात भाषणात म्हटले होते की, कोणतीही राज्यघटना तेव्हाच मोलाची ठरेल जेव्हा तिला वापरणारे योग्य असतील. अयोग्य लोकांच्या हातात राज्यघटना पडली तर तिचा काही उपयोग होणार नाही.

हाच संबंध धर्माशीही जोडला जाणारा आहे. कोणताही धर्म वाईट नाही मात्र, त्या धर्माचे अनुयायी तो धर्म कसा चालवतात यावर त्या धर्माचे बरेवाईट ठरते. त्याचप्रमाणे कोणताही महामानव हा चांगलाच आहे. मात्र त्या महामानवाचे विचार त्यांचे अनुयायी समाजापर्यंत योग्यप्रकारे पोहचवत नसतील तर हे त्या महामानवाचा पराभव म्हणावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांनी या महापुरुषांचे चारित्र्य, त्यांचे कार्य, समाजसेवा यांची माहिती घ्यावी.

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची देशभरात विटंबना केल्याच्या घटना सर्रास घडतात. अज्ञानी लोकांकडून असे कृत्ये घडत असते. असे लोक महापुरुषांची नव्हे तर देशाचीच विटंबना करीत असतात. तरुणांना चुकीच्या मार्गदर्शनामुळे महामानवांविषयी चुकीची प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण केली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून महापुरुषांची विटंबना करण्याचे धाडस होते. डॉ. आंबेडकर यांच्याविरुद्ध विरोधी सूर असणाऱ्यांकडून दोन समाजात भांडणे लावण्याचेही काम केले जाते.

भारतातील सुजाण नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. राजधानीत भारतीय संविधान खुलेआम जाळले जाते. या घटनेचा निषेध करण्याऐवजी अनेकांनी याचे समर्थन केले. अशा घटना देशासाठी मारक ठरतात. आज सर्व शाळांमध्ये इतर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतीथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेतले जातात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती तर 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त क्‍वचित शाळांमध्येच अभिवादन कार्यक्रम घेतले जातात.

महापुरुषांना कितीही विरोध केला तरी त्याचे विचार कधीही मरत नाहीत. आंधळ्या समाजाला त्यांचे विचार नेहमी प्रकाश दाखविण्याचे कार्य करीत असतात. महापुरुषांचे विचार समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठीच असतात. जातीधर्माच्या नावावर राजकारण करणारे कमी नाहीत. महामानवांचे विचार दाबून त्यांचा अपप्रचार करून त्यांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच पराभव करीत आहोत, हे आपल्या लक्षात यायला हवे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)