प्रेरणा : महिलांनी साधली दारूमुक्‍त निवडणूक

-दत्तात्रय आंबुलकर

महाराष्ट्रातील दुसरा दारूबंदी असणारा जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची प्रशासकीय ख्याती. अशा या जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली असली तरी आजवर हा जिल्हा खऱ्याअर्थाने दारूमुक्‍त झाला नव्हता. मात्र, गडचिरोली जिल्ह्याला खऱ्या अर्थाने दारूमुक्‍त करण्याचे काम जिल्ह्यातील ग्रामीण आणि वनवासी महिलांनी केले व तेही यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर!

गडचिरोली जिल्ह्यातील मुक्‍तीपथ अभियानाने या महिलांना दिशा देण्याचे महनीय काम केले. अभियानाने त्यांना आवश्‍यक आत्मविश्‍वास दिल्याने त्यानुसार कृती सुरू झाली व त्यातूनच खऱ्याअर्थाने तब्बल 26 वर्षांनंतर जिल्ह्याच्या दारूमुक्‍तीला चालना मिळाली. ऐतिहासिक संदर्भात सांगायचे झाल्यास वनवासी बहुल व नक्षलीदृष्ट्या अति संवेदनशील अशा गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक तयार केली जाते ती मोहापासून बनविलेली गावठी दारू. अशी हातभट्टीची दारू गाळली जात नाही. यामागे आदिवासी जीवनाशी संबंधित धार्मिक-सामाजिक परंपरा आहे.

याचाच परिणाम म्हणून शासकीय स्तरावर दारूबंदी लागू असणाऱ्या या जिल्ह्यात प्रत्येक वनवासी कुटुंबाला 5 लिटरपर्यंत हातभट्टीची दारू गाळण्याची-बाळगण्याची जणू अलिखित परवानगीच देण्यात आली आहे. मात्र, या धोरणाचा गैरवापर करत अनेक स्थानिक लोकांनी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातच स्थानिक स्वरूपात रोजगाराची इतर साधने उपलब्ध नसल्याने मिळकतीचा हा मार्ग अनेकांना सोपा वाटला व त्यातून संपूर्ण जिल्ह्यातीलच दारू विक्री वाढत गेली.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर व विशेषतः कोणतीही निवडणूक पैसे व दारूशिवाय होऊच शकत नाही हे आजवरचे गडचिरोली जिल्ह्यातील चित्र. पण यावेळी दारूमुक्त निवडणूक हे उद्दिष्ट घेऊन मुक्तीपथ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी नव्याने जागृती सुरू केली. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन म्हणून दारू वाटणाऱ्यांना मतदान करायचेच नाही असा ठोस पवित्रा घेणाऱ्या या महिलांना प्रतिसाद मिळू लागला.

“जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्‍कीच पाडू’ असे लिहिलेले लक्षवेधी फलक गडचिरोलीच्या शहरी-ग्रामीण भागात दिसू लागले. यातून निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे समर्थक-कार्यकर्त्यांना योग्य संदेश मिळत गेला. त्याशिवाय ज्येष्ठ समाजसुधारक नेते डॉ. अभय बंग यांनी लोकशाहीचा समाजोत्सव असणाऱ्या निवडणुकीत मतदानासह सहभागी होणाऱ्यांनी दारू पिऊन मतदान करण्यापेक्षा संपूर्णपणे शुद्धीवर राहून मतदान करण्याचे आवाहन केले.

आपल्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात या महिलांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. पण त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे बघून त्यांनी स्वतःच दारू विक्रेत्यांच्या दुकान-घरांवर धाडी टाकण्यास व दारू गाळणे बनविण्यासाठी वापरातील पदार्थ-साहित्य नष्ट करण्यास सुरुवात केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.