प्रेरणा : श्रमदानाद्वारे पाणीप्रश्‍न सोडविणारे गाव

संग्रहित छायाचित्र....

-दत्तात्रय आंबुलकर

पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ अशा वेल्हे तालुक्‍यातील पासली खोऱ्यामधील वेळवंडी नदीच्या उगमापासून काही अंतरावर वरोती खुर्द हे गाव वसलेले आहे. गावातील घरटी एक पुरुष माणूस मुंबई-पुण्याकडे नोकरी रोजगारासाठी स्थलांतरित झाला असून 55 कुटुंबे असलेल्या या गावातील आता फक्‍त स्थलांतरित पुरुषांच्या कुटुंबातील वृद्ध, बायका व मुले तेवढी आहेत.

वेल्हे तालुक्‍यातील पावसाळ्यात सरासरी 2000 ते 2500 मि.ली. पाऊस पडतो आणि तरीही उन्हाळ्यात मात्र या डोंगराळ भागातील वरोतीसारख्या अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असतेच. अनेक वर्षांनंतरही दुर्दैवाने ही स्थिती बदललेली नाही. मात्र, आता अधिक वेळ न पाहता आपले गाव आणि परिसरातील सहामाही पाणीटंचाईची समस्या कायमची सोडविण्यासाठी भोर व वेल्हे तालुक्‍यांतील जी गावे व गावकरी प्रयत्नपूर्वक सामोरे येत आहेत अशांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची व्यापक सामाजिक भूमिका ज्ञान प्रबोधिनीने घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रबोधिनीने या पाणीप्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी योजनापूर्वक वेळापत्रक तयार केले. त्यामध्ये आवश्‍यक वेळ आणि खर्च या दोन्ही बाबींचा समावेश करण्यात आला. यात विहीर पुरेशी रूंद करणे व खोल करणे येथपासून विहिरीभोवती संरक्षक कठडा बांधून विहिरीतील पाणी काढण्यासाठी रहाट बांधण्यापर्यंत सर्व समावेश करण्यात आला होता व त्यासाठी सुमारे 9 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

प्रबोधिनीचेच माजी विद्यार्थी असणाऱ्या प्रमोद सडोलीकर यांनी त्यांच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे निधी जमविण्याची जबाबदारी घेतली. जोडीला रोटरीच्या माध्यमातून निधी जमविण्यात आला. प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी व रोटरी सभासदांनी वरोती खुर्द गावाला भेट देऊन गावकऱ्यांची नेमकी समस्या जाणून घेतली. यातून पहिल्या प्रयत्नात 14 माजी विद्यार्थ्यांनी 3 लाख रुपयांची वर्गणी जमा केली.

यातून विहिरीच्या खोदकामाचा मोठा टप्पा मे 2016 मध्ये पूर्ण झाला. या प्रयत्नाला गावकऱ्यांच्या श्रमदानाची जोड मिळाली व त्याच्याच जोडीला पर्सिस्टंट फाउंडेशनच्या मदतीने उर्वरित काम मार्गी लागून 2016 च्या उन्हाळ्यात विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले. त्यातूनच 33 फूट खोल व 30 फूट रूंद अशी मोठी सामाजिक विहीर वरोती खुर्दमध्ये तयार झाली. बांधकामाच्या अखेरच्या टप्प्यात संरक्षक कठडा मे 2018 मध्ये पूर्ण करून त्यानंतर गावात उन्हाळ्यासह बारमाही पाणी उपलब्ध झाले.

वरोती खुर्द येथील गावकीच्या विहिरीचे सुरुवातीचे बांधकाम सुरू असतानाच सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मे 2016 मध्ये गावाला भेट दिली आणि तपशीलवार माहिती करून घेतली. विहिरी परिसरातील चिरा-भेगा इ. पाहून राजेंद्रसिंह यांनी अभ्यासांती वरोतीच्या विहिरीला पाण्याची टंचाई जाणविणार नाही असा निर्वाळा दिला. प्रबोधिनीचे मार्गदर्शन व मुख्य म्हणजे ग्रामस्थांच्या प्रयत्नपूर्वक श्रमदानाद्वारे हा पाण्याचा प्रश्‍न सोडवून दाखविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)