आठवण : आमचा मार्कण्या बैल

-सत्यवान सुरळकर

माझ्या वडिलांच्या छातीवर मोठी खूण होती. आम्ही ती खूण पाहून नेहमी वडिलांना विचारायचो की, हे काय लागले आहे, ते म्हणायचे, आपल्या मार्कण्या बैलाने मारले आहे. त्याची ती खूण आहे.

आमचा मार्कण्या बैल. तो कुणालाही आपल्या शिंगावर उचलून खाली आपटत असे. दिसेल त्याला मारणे हा त्याचा उद्योग असल्याने त्याचे नाव मार्कण्या ठेवले होते. गावातील सांड बैलालाही त्याने लोळवून मारल्याची गावात चर्चा रंगली होती. इतर बैल तर मार्कण्याच्या आजूबाजूने फिरकतही नव्हते. या मार्कण्या बैलाला पावसाळ्यात काळ्या रंगाच्या छत्रीचा भयंकर राग. कुठे काळी छत्री दिसली की आपले नाक फुत्कारून गेलाच समजा मारायला. कित्येकांना छत्रीसोबत शिंगावर उचलल्याचे किस्से ऐकून आम्हाला आनंद वाटायचा. या मार्कण्या बैलाची दहशत सर्वदूर पसरली होती म्हणे. रस्त्याने चालताना त्याचा डामडौल काही औरच होता. पिण्याच्या तलावावर एक-दोन बैलांना डुसे मारल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.

एकदा आम्ही रात्रीच्या वेळी वडिलांसमोर घोळका करून बसलो व हट्ट धरला की मार्कण्या बैलाने तुम्हाला कसे मारले ते सांगा. मग वडिलांनी ती घटना सांगायला सुरुवात केली, आरं, त्या रात्री लय पाणी (पाऊस)पडला होता. म्हणून रामपहारी गाडी जुंपली न्‌ वावराकडे निघालो. पाणी लय पडल्याने रस्त्यावर गारा (चिखल) झाला होता. सगळीकडे चिपचिप गारा. बैलगाडीची चाकंही गाऱ्यात रुतत होती. पण आपल्या मार्कण्या बैल जोर लावून गाडी बाहेर काढायचा. त्याच्याबरोबर जोरात चालताना आपल्या गरीब डाक्‍टऱ्या बैलाचे लय हाल होत.

मार्कण्या बैलाच्या शेपट्याला हात लावला तरी तो जोरात उडी मारून गाडी पळत नायचा. त्या दिशी त्यानं चारा खाल्ला नाही की पाणी पिला नाही. भूर..भूर पाणी सुरूच होता. डोक्‍यावर घोंगडं घेऊन तुही माय तुले घेऊन बसली होती. तुले पाणी लागू नई त्यासाठी तुह्या डोक्‍यावर पैजाची मोठी पाने बांधली होती. गाडी नदीजवळ आली पाहतो तर काय सूर नदीले हा मोठ्ठा पूर! गाडी पुरात कशी टाकणार म्हणून मी गाडी थांबवली. पण मार्कण्या बैल ऐकेना.

डाक्‍टऱ्या बैल तिथेच थबकला. मी गाडीतून खाली उडी टाकली. दोन्ही बैलाचं जुतं काढलं अन्‌ पुराच्या अंगाला मार्कण्याला जुंपलं अन्‌ दुसऱ्या बाजूला डाक्‍टऱ्याला. जस दावं घेऊन मी गाडीत बसणार तसं मार्कण्यानं गाडी ओढली पुरात. पुराचं पाणी काटत तो पुढे जात होता. तू अन्‌ तूही माय रडायले लागले. मी घाबरलो. वाटलं गाडी वाहून जाते आता पुरात. डाक्‍टऱ्याचेही पाय लटपटले. पाणी चाकाच्या वर होतं पण मार्कण्याने जोर देऊन गाडी पुरातून बाहेर काढली. मरायच्या दारातून आलो असं वाटलं.

वावरात पोहोचलो, नदीमायने चतकोर वावर खाल्लं अन्‌ अर्ध्या वावरात पाणीच पाणी. मी डोक्‍यालाच हात लावला. वावरात हातभर कपाशीच पीक उगवलंल, पण पाण्यामुळे पिकानं खाली माना टाकल्या होत्या. दिवसभर तुले झाडाले झोका टांगून त्यात टाकलं होतं. बैलांना चारा टाकला. मी न्‌ तुही माय वावरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी चर खोदत होतो.
दुपारनंतर ढग भरून आलं. पाणी पडणार व नदीला आणखी पूर येणार म्हणून मी काम आवरलं. बैलगाडीत भारा टाकून बैल जुपायले घेतले. डॉक्‍टऱ्याने जोतं घेतलं, पण मार्कण्या काही खांद्यावर जोतं घेत नव्हता.

डाक्‍टऱ्याच्या खांद्यावर वझं झाल्याने मी मार्कण्याले जोरात ओढला तसा तो जोऱ्यात फुत्कारला. त्याने शेपूट वर केलं. पुढच्या पायाने गारा उडवला. मी त्याचं दावं घट्ट पकडलं होतं. मी त्याला ओढून गाडीला जुंपणार तसं तो मागं सरकला. गाडीचं वझ एकट्या डाक्‍टऱ्यावर आल्याने तो खाली बसला तसं गाडी पुढे वाकल्याने तू न तुही माय खाली पडले. मी मार्कण्याचं दावं ओढलं तसं तो मह्या अंगावर धावला, मले जोरात ठुसी देऊन मह्या छातीले शिंग रोवलं. मी जोरात ओरडलो. शिंग छातड्यात रुतलेला. तुही माय माणसांना बोलवत ओरडत सुटली, तू मह्या पाया पाशीच पडलेला. चिखलात पाय रुतलेले अन्‌ छातीत शिंग. प्रसंग बाका होता. तुह्या अंगावर मह्या पाय पडायले नको म्हणून मी जीवाच्या आकांताने मार्कण्याला पुढे ढकलले पण जनावऱ्याच्या ताकदीपुढे माणसाचा काय निभाव लागेल.

एका जनावरात व माणसात हे युद्ध जुंपलं होतं. हे युद्ध हारजीतसाठी नव्हतं. तुह्या मायनं तुले लगेच खालून उचलून घेतलं. मग मी उधळलेल्या जनावरावर जोर न दाखवता त्याले शांत करायले गेलो. मार्कण्या, ए मार्कण्या मह्या छातीत शिंग घुसले रे बापा तुहे, काढ ते शिंग. तसं मार्कण्या बाजूला झाला. छातीला रक्ताची धार लागली. तुह्या मायेनं चिखल मह्या छातीले लावून कापडानं घट्ट बांधलं. मी थोडा वेळाने शांत झालो. मार्कण्याही शांत झाला. मग मार्कण्याला गाडीला जुपलं. अन्‌ कसंतरी नदी ओलांडून घर गाठलं.

पुढच्याच आठवड्यात फत्तेपूरच्या बाजारात मार्कण्याला विकायला घेऊन निघालो. तुह्या मायनं पुरणची पोळी मार्कण्याला खायला दिली. त्यानं ती खाल्ली. मी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याला रस्त्याकडे ओढला. पण तो थबकला, पुढे येईना. सारखा तुह्या मायकडे पाहून मागे ओढायचा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याले तसाच ओढून बाजाराले घेऊन गेलो. बाजारात एवढा राजबिंडा, रंगाने काळाभोर, उंचपुरा, आडदांड शरीराचा बैल पाहून जो तो पैशाचं गाठोडं मह्या हातात ठेवत होता. मह्या सोन्यासारखा बैल मले इकायचा नव्हताच पण शेवटी इकलाच.

बैलाचं दावं सोडून त्याले दुसऱ्या मालकाच्या हवाली केलं. मी छातीले हात लावून मार्कण्याला एकदा शेवटचं मनभरून पाहिलं. त्याचं उरलेलं दावं एका हातात व दुसऱ्या हातात पैशाचं गाठोडं घेऊन मी परतीच्या वाटेला लागलो. मनात दुःख दाटून आलं… पाणी रिपरिप पडतच होता… रस्ता अजून बराच पार करायचा होता…

Leave A Reply

Your email address will not be published.