विविधा : दिलीप सरदेसाई

– माधव विद्वांस

भारताच्या क्रिकेट संघाचे फलंदाज दिलीप सरदेसाई यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1940 रोजी त्यावेळच्या पोर्तुगीज गोव्यातील मडगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण गोवा येथेच झाले.घरगुती कारणास्तव त्यांचे आई वडिलांसह ते 17 व्या वर्षीच मुंबई येथे स्थलांतरित झाले. त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे क्रिकेट प्रशिक्षक मन्या नाईक यांनी त्यांच्यातील गुणवत्ता ओळखली.

सरदेसाई यांनी विद्यापीठांतर्गत सामन्यात आपल्या खेळातही चुणूक दाखवली. त्यांनी रोहिंटन बारिया ट्रॉफी स्पर्धेत 1959/60 च्या हंगामात 87 धावांच्या सरासरीने 435 धावा केल्या व मुंबईच्या क्रिकेट जगात आपली ओळख दिली. 1960-61 मध्ये पाकिस्तान संघाच्या दौऱ्यावेळी संयुक्‍त विद्यापीठाच्या संघासाठी त्यांची निवड केली. त्यांच्या खेळामुळे प्रभावित होऊन निवड समितीचे अध्यक्ष लाला अमरनाथ यांनी त्यांना अध्यक्षीय संघ विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी निवड केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिसेंबर 1961 मधे कानपूर येथे इंग्लंड दौऱ्यावेळी भारतातर्फे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांना भारतीय संघात समाविष्ट केले. कसोटीपर्यंत आघाडी घेतल्यानंतर त्यांना आक्रमक स्ट्रोकप्लेअर म्हणून ओळखले जाऊ त्यांनी 1963-64 मधे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेत 449 धावा केल्या आणि अंतिम कसोटीत 79 व 87 धावा करून फॉलोऑन टाळून सामना अनिर्णित ठेवला. 1964-65 मधील न्यूझीलंड संघाच्या भारत दौऱ्यावेळी सरदेसाईंनी मुबई येथे द्विशतक झळकावले. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला फॉलोऑनची नामुष्की आणली होती; पण सरदेसाईंच्या नाबाद द्विशतकामुळे भारताने ही लढत जिंकली.

1966-67 मध्ये ते वेस्टइंडीजविरुद्ध खेळले. 1970-71 मध्ये वेस्टइंडीजच्या भारतीय दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली. किंग्सटनच्या पहिल्या कसोटीत भारताची 5 बाद 75 अशी अवस्था झाली होती. पण सरदेसाईंनी 212 धावा केल्या आणि धावसंख्या एकूण 387 पर्यंत नेली. पोर्ट ऑफ स्पेनच्या पुढील कसोटीत त्यांच्या 112 धावांनी वेस्टइंडीजवर भारताला पहिला विजय मिळवला. चौथ्या कसोटीत त्यांनी आणखी 150 धावा केल्या. ही मालिका भारताने जिंकली. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी सरदेसाईंना भारतीय क्रिकेटचा पुनरुत्थान करणारा माणूस, असे म्हटले होते.

सरदेसाई 179 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये 10,230 धावा 41च्या सरासरीने काढल्या. सरदेसाई 30 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये 2001 धावा 39.23च्या सरासरीने काढल्या. 5 शतके व 9 अर्धशतके काढली. 212 ही त्यांची कसोटीमधील सर्वोच्च धावसंख्या. डिसेंबर 1972मधे इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळले व निवृत्त झाले.

नंदिनी पंत यांनी मात्र त्यांची विकेट काढली. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या समोरील “बेरी’ज रेस्टोरंटमध्ये त्यांची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी विवाह केला. प्रसिद्ध टीव्ही वृत्तवाहिनी संपादक राजदीप सरदेसाई हे त्यांचे पुत्र आहेत. 2 जुलै 2007 मध्ये त्यांचे निधन झाले. अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)