शेळ्या-मेंढ्यांसाठी तरतूद करण्याची मेंढपाळांनी केली मागणी

किरण जगताप
कर्जत  – कर्जत तालुक्‍यातील शेकडो मेंढपाळांना मेंढ्या जगविण्यासाठी गाव आणि घरं सोडून जावे लागले आहे. मोठ्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. मात्र शेळ्या मेंढ्यांसाठी शासनाने कोणतीही तरतूद न केल्याने मेंढपाळांना गावोगाव भटकंतीची वेळ आली आहे. मेंढपाळांच्या प्रश्‍नावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घालून, त्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजना राबविण्याची मागणी केली जात आहे. कर्जत तालुक्‍यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने मेंढ्या जगवण्यासाठी गावे, घरे सोडून सधन भागाकडे जातात. चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी कर्जत तालुक्‍यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बारामती, इंदापूर भागात स्थलांतरित होतात.

यंदाच्या तीव्र स्वरुपाच्या पाणी व चारा टंचाईमुळे अनेक महिन्यांपासून मेंढपाळ हा दुष्काळी भाग सोडून गेलेले आहेत. टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्याने मेंढपाळ गावाकडे फिरकलेच नाहीत. दुष्काळामुळे त्यांचे स्थलांतर लांबले आहे. पाणी नाही, मेंढ्यांना चरण्यासाठी गवत नाही, मग इकडे येऊन आम्ही करणार काय? असा त्यांचा प्रश्‍न आहे. पावसाने दगा दिल्याने, हे मेंढपाळ आपला भाग सोडून अन्यत्र मुक्काम ठोकून राहिले आहेत. कर्जत तालुक्‍यातील राक्षसवाडी, ताजु, बेलवंडी, जलालपूर आदी गावे ओस पडल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.

पूर्वी शेतात बाभूळ, खैर, एरंड, सुबाभूळ, निंब आदी झाडे मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता शेतातील झाडांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडाच्या पालापाचोळ्यावर मेंढ्यांना भूक भागवावी लागत आहे. मेंढ्यांचा पाण्याचा व बरोबरच चाऱ्याचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला असून, मेंढपाळ व्यवसाय धोक्‍यात आला आहे. तालुक्‍यातून मोठ्या संख्येने मेंढपाळ कुटुंबासह स्थलांतरित झाल्याने त्यांचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे मतदानही होऊ शकलेले नाही.

रानोमाळ भटकंती करणारा धनगर मेंढपाळ समाज अनेक वर्षांपासून उपेक्षित, वंचित राहिलेला आहे. मेंढपाळांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही अद्याप कोणत्याही सरकारने केले नाही. मतदारसंघातील प्रा. राम शिंदे हे मंत्री झाल्यानंतर समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देतील असे जनतेला वाटत होते. मात्र त्यांच्याकडून मेंढपाळ समाजासाठी कोणतीही योजना राबविण्यात आलेली नाही. यापुढे तरी समाजासाठी ते काही करतील का? हा प्रश्‍न आहे.

दत्तात्रय शिपकुल, सामाजिक कार्यकर्ते, राक्षसवाडी बु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)