जामखेड आगाराला निवडणुकीत पावणेसात लाखांचे उत्पन्न

ओंकार दळवी

लग्नसराईत गैरसोय
दोन दिवस एसटीच्या काही फेऱ्या बंद होत्या. या काळात लग्नसराई असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांना अधिक भाडे खर्च करुन, खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. मंगळवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आगारात सर्व बसेस जमा करण्यात आल्या होत्या. बुधवारपासून सर्व फेऱ्या सुरळीत झाल्या.

जामखेड – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी जामखेड आगारातील 30 बसेस दोन दिवसांसाठी भाडेतत्वावर घेतल्या होत्या. या दोन दिवसांत महसूल प्रशासनाकडून आगाराला भाड्यापोटी 6 लाख 82 हजार 616 रूपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे सतत तोट्यात चाललेल्या जामखेड आगाराला लोकसभा निवडणुकीमुळे का होईना अच्छे दिन आले. 23 एप्रिलला नगर लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी 22 व 23 एप्रिलला महसूल प्रशासनाने दोन दिवसांसाठी 48 बसेसची मागणी महामंडळाकडे केली होती. यातील 30 बसेस जामखेड आगारातून तर, 18 बसेस ताराकपूर आगारातून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील 18 बसेसचे उत्पन्न ताराकपूर आगाराला देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी यांना पोहोचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महामंडळाकडून विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, वाहतूक अधीक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे कर्मचारी शेवटची बस मतदान केंद्रावर पोहोचेपर्यंत तसेच शेवटची बस केंद्रावरून परत येईपर्यंत सज्ज होते. एखादी बस रस्त्यात बंद पडल्यास ती तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कार्यशाळेचे चार कर्मचाऱ्यांचे एक पथकही सर्व सामुग्री घेऊन तैनात करण्यात आले होते. तसेच दोन जादा बसेस उपलब्ध केल्या होत्या.

निवडणुकीसाठी बसेस आरक्षित केल्यामुळे काही बसफेऱ्यांवर परिणाम झाला होता. या दोन दिवसांच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगाराकडून नियोजन करण्यात आले होते. जामखेड आगारातील बसफेऱ्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. रद्द केलेल्या बसफेऱ्यांमधून जेवढे उत्पन्न मिळाले नसते, त्यापेक्षा अधिक उत्पन्न दोन दिवसांत महसूल प्रशासनाकडून आगाराला मिळाले. निवडणूक झाल्यांनतर 23 व 24 रोजी 4 बसेस यवतमाळ व भंडारा येथे 150 पोलीस कर्मचाऱ्यांना पोहचविण्यासाठी पाठविण्यात आल्या. कमी डिझेल खर्चात अधिक उत्पन्नाचा टप्पा गाठता आला. या दोन दिवसात जामखेड आगाराला 6 लाख 82 हजार 616 रूपये इतके घसघशीत उत्पन्न मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.