कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण

मुंबई -कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या मित्रपक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना गुरूवारी महाराष्ट्रात उधाण आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील भेट त्या चर्चांसाठी कारणीभूत ठरली.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने घवघवीत यश मिळवल्यामुळे विरोधकांची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षही त्याला अपवाद ठरले नाहीत. निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पवार आणि राहुल यांची भेट झाल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांत विलीन होण्याची शक्‍यता असल्याच्या राजकीय अटकळी बांधल्या जाऊ लागल्या. त्या अटकळींसाठी विरोधी पक्षनेतेपद हेही एक कारण बनले आहे.

कॉंग्रेसला लोकसभेच्या 52 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यासाठी त्या पक्षाला 2 जागा कमी पडत आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ 5 इतके आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विलीन झाल्यास कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगू शकेल, अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी पवार आणि राहुल यांच्या भेटीत विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याविषयी माहिती नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)