लक्षवेधी: विरोधकांनाही बदलावेच लागेल

विलास पंढरी

नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता खेचून आणली असल्याने विरोधकांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांनी याचा विचार करून स्वतःच्या पक्षात अनेक बाबतीत आवश्‍यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला 282 जागा मिळवत पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होत जबरदस्त धक्‍का देणाऱ्या मोदींनी गेल्या 5 वर्षांत अनेक धक्‍के दिले आहेत.

अचानक पाकिस्तानमध्ये जाऊन नवाझ शरीफांची घेतलेली भेट, महाराष्ट्रात ब्राह्मण समाजातील फडणवीसांना दिलेले मुख्यमंत्रिपद, यूपीच्या मुख्यमंत्रिपदी योगींची केलेली अनपेक्षित निवड, हरियाणातील जाटेतर असलेले खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून केलेली निवड आणि संरक्षणपदी केलेली निर्मला सीतारामन यांची निवड, उरीवरील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या मृत्यूचा बदला म्हणून थेट पाकिस्तानमध्ये घुसून केलेला धाडशी हल्ला आणि त्याचा प्रचारात खुबीने केलेला उपयोग असे अनेक धक्‍के देत राजकीय विरोधकांना सतत बॅकफूटवर ठेवण्यात मोदी प्रचंड यशस्वी झाले. काळ्या बाजारवाल्यांबरोबरच राजकीय पक्षानांही दणका देणारी नोटबंदी आणि तयारी नसताना आणलेली जीएसटीप्रणाली, राष्ट्रपतीपदासाठी कोविंदांची आणि उपराष्ट्रपतींपदासाठी केलेली व्यंकय्या नायडूंची निवड, गंमत म्हणजे हे सगळे धक्‍के दृश्‍य स्वरूपातील होते आणि मोदींचा यात प्रत्यक्ष संबंध होता.

माजी राष्ट्रपती मुखर्जींना संघ मुख्यालयात बोलावण्यात मोदींचा उघड संबंध कुठेही दिसत नाही. पण मुखर्जींना संघाच्या मुख्यालयात बोलविण्यात मोदींचा सिंहाचा वाटा होता. प्रणवदांशी पंतप्रधान झाल्यापासूनच अगदी ठरवून चांगले संबंध विकसित केले होते. प्रणवदा राष्ट्रपतिपदावर असताना कट्टरवादामुळे देशात आणि देशाबाहेरही नरेंद्र मोदी टीकेचे धनी होते. राष्ट्रपती म्हणून आपल्या अखेरच्या भाषणात तर मोदींच्या धडाडीने आणि ऊर्जेने काम करण्याच्या पद्धतीची त्यांनी प्रशंसाच केली. मोदींनीही प्रणवदा आपल्याला पितृतुल्य असल्याचे सांगत आपले संबंध किती गहिरे होते याची पावती दिली. यातील प्रत्येक धक्‍का मोदींचे स्थान बळकट करणारा आणि कमजोर झालेल्या विरोधकांना अधिक कमजोर करणारा होता हे या निवडणुकीत विरोधकांचे झालेले पानिपत बघता आता लक्षात यायला हरकत नसावी. संविधानाची मोडतोड करण्याचा सतत आरोप करणाऱ्या विरोधकांना लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतरच्या पहिल्याच भाषणापूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमधे ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीला मनःपूर्वक केलेला नमस्कार हा विरोधकांच्या आरोपातील हवा काढणारा या टर्ममधील पहिला धक्‍का आहे.

खरे तर घटनादुरुस्तीसाठी लागणाऱ्या दोन तृतीयांश बहुमताला केवळ 9 जागा कमी पडत असताना एनडीएमध्ये सामील व्हायला तयार असलेले जगनमोहन रेड्डींच्या साहाय्याने आवश्‍यक असलेली कुठलीही घटनादुरुस्ती मोदी आता करू शकतील. शपथविधीला केजरीवाल, ममता बॅनर्जीपर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांना बोलावून मोदींनी सर्वसहमतीच्या राजकारणाची अनपेक्षित पण चांगली सुरुवात केली आहे.

मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा एवढा दारुण पराभव झाला की केवळ 44 जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेते पदही मिळू शकले नाही.आता यावेळीही 52 जागा मिळाल्याने विरोधीपक्ष नेतेपद कॉंग्रेसला मिळणार नाही. आता 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी अनेक सापळे रचले खरे परंतु तेच त्यात अडकले.

शीखविरोधी दंगलीच्या भळभळत्या जखमा घेऊन आजही शीख बांधव जगत असताना झाले ते झाले, त्याचे आता काय, असे म्हणत त्या जखमेवरची खपली काढण्याचे कृत्य सॅम पित्रोदा यांनी केले आहे. ममता दीदीनेही पंतप्रधानांवर केलेल्या टीकेमुळे 42 पैकी 2 जागा मागील निवडणुकीत जिंकलेल्या भाजपाला आपले बळ 18 जागांपर्यंत वाढवण्यासाठी मदतच झाली. मायावतींनी तर अजून खालची पातळी गाठली आहे. मोदींनी आपल्या पत्नीला सोडल्याने भाजप पुरुष कार्यकर्त्यांच्या पत्नींना आपले नवरे सोडून देतील अशी भीती वाटते. त्यामुळे अशा बायकांनी मोदींना मते देऊ नयेत. या अजब तर्काला काय म्हणावे? मायावतींचा पेहेराव, रहनसहन हा त्यांचा पूर्ण वैयक्‍तिक मामला आहे.

मोदींनी यावर भाष्य केल्याचे पाहण्यात तरी नाही. इकडे पवार साहेब देशासह बारामतीत अनपेक्षित निकाल लागल्यास ईव्हीएमवर शंका घेत लोकांचा मतदान प्रक्रियेवरील विश्‍वास उडेल व मोदी सरकार 15 दिवसच टिकेल अशी भविष्यवाणी वर्तवत मोदीच सत्तेवर येणार हेच दर्शवित होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोदी विरुद्ध सगळे अशी 2014 सारखी स्थिती मोदींना निर्माण करायची होती आणि त्यात ते शंभर टक्‍के यशस्वी झाले. त्यांचा करिष्मा आणि आत्मविश्‍वास भाजपला 303 जागा मिळवण्याचा चमत्कार करू शकला.

सोनिया गांधीनी मोदींवर वैयक्‍तिक टीका केल्याने त्याचा कॉंग्रेसला फटका बसला होता हे विसरून राहुल आणि प्रियांका गांधी यांनीही मोदींवर वैयक्‍तिक टीका केली. राहुल गांधींच्या राहणीबद्दल, अजूनही अविवाहित असल्याबद्दल मोदी कधीही वैयक्‍तिक टीका करीत नाहीत. प्रियांका गांधी यांनी पक्षात मोठे पद स्वीकारल्यापासून स्वतःची टिपिकल साडीतील स्त्रीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर मोदींनी कधीही भाष्य केलेले नाही व करणारही नाहीत. मोदी बोलतात ते केवळ राजकीय कारकिर्दीवर, तद्‌अनुषंगिक अनियमिततांवर. ज्या मोदींचे भाऊ अजूनही किराणा दुकानासारखे छोटे व्यवसाय करतात, ज्यांची आई छोट्याशा फ्लॅटमध्ये राहते आणि ज्यांनी कुठलीही प्रॉपर्टी करणे सोडाच, आपल्या पगारातील पैशातून केलेली बचतसुद्धा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान केली अशा माणसाला निवडणूक जिंकणे अधिक सोपे झाले. या निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांनी ज्यांनी मोदींवर टीका केली त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, कीर्ती आझाद हे मोदींवर टीका करीत भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेले आणि जोरदार आपटले. त्याचबरोबर ममता, मायावती, केजरीवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंग, मेहेबुबा मुफ्ती, देवेगौडा, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, राजू शेट्टी, चंद्राबाबू नायडू अशी टीकाकारांची मोठी यादी आहे.

अत्यंत नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. एकेकाळी या देशात 60-70 खासदार निवडून येणाऱ्या या पक्षाची आता काय अवस्था आहे? केवळ दोनच खासदार अशी या पक्षाची ओळख झालेली आहे. दारुण पराभवाने होरपळून गेलेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा वर काढणे ही अत्यंत कठीण बाब आहे. हे आव्हान म्हणून स्वीकारताना कॉंग्रेसला आता आपल्या ध्येयधोरणात आमूलाग्र बदल करावाच लागेल व जर बदल केले नाही तर या पक्षाची अवस्था कम्युनिस्टांप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही. आतातरी विरोधकांना शहाणपण सुचेल काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)