आमदारांचे सामान चोरणाऱ्या आरोपीला बेड्या

मुंबई – विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांचे सामान ट्रेनमधून चोरी झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अहमद हबीब अली सय्यद (28) असे आहे. त्याच्यावर जीआरपीमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी सामान जप्त केले आहे.

भायखळा विशेष कृती दल आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी मिळून आरोपी अहमद हबीब अली सय्यद याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला पकडलं आहे. आरोपीने घातलेल्या कपड्यांच्या आधारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा माग घेतला. त्यानंतर त्याचा फोटो पोलिसांनी सर्वच रेल्वे पोलिसांना तो पाठवला.

सोमवारी (24 जून रोजी) कॉंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हे आपल्या कुटुंबियांसोबत विदर्भ एक्‍सप्रेसने मलकापूरहून मुंबईत येत होते. तर शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर हे जालन्याहून देवगिरी एक्‍सप्रेसने मुंबईत येत होते. मात्र, कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्याने प्रवेश केला आणि आमदारांच्या साहित्यावर डल्ला मारला. आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नी वृषाली यांच्या उशाला ठेवलेली पर्स चोरट्याने पळवली. त्याच दरम्यान वृषाली यांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरड केला. आमदार राहुल बोंद्रे यांनी त्या चोरट्याचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने पळ काढला.

कल्याण रेल्वे स्थानकात घातल्या बेड्या

फोटोच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या कल्याण येथील घरी दाखल झाले. मात्र, आरोपी सय्यद हा नाशिक येथे गेल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी मंगळवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)