बुगडे, कऱ्हाडे कला गौरव; कार्तिकीला प्रेरणा पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद : तळेगाव शाखेचा 26 मे रोजी वर्धापन दिन
वडगाव मावळ – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कलागौरव आणि प्रेरणा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे कलाकार संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये, खुलता काळी खुलेना) आणि श्रेया बुगडे (चला हवा येउ द्या, तू तिथे मी) यांना कलागौरव पुरस्काराने; तर कलाक्षेत्रात विशेष कामगिरी करणारी गायिका कार्तिकी गायकवाड हिला प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

येत्या 26 मे रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखा आपला 14 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. वर्धापनाचा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेसहा वाजता सेवाधाम वाचनालय, नाना भालेराव कॉलनी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे, श्रेया बुगडे यांना कलागौरव पुरस्काराने, तर कार्तिकी गायकवाडला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार ज्येष्ठ सिनेनाट्य कलाकार राजन भिसे आणि अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी आमदार कृष्णराव भेगडे भूषविणार असून, या समारंभासाठी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जी. एस. टी. मुंबईचे वरिष्ठ उपायुक्‍त सुनील काशीद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा नेहमीच नाट्य कलेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असून, तळेगावातील अन्य संस्थांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आली आहे. आजपर्यंत तळेगाव शाखेच्या विविध कार्यक्रमांना अनेक नाट्य सिने कलावंतानी हजेरी लावली आहे. यामध्ये मोहन जोशी, शरद पोंक्षे, दिलीप प्रभावळकर, प्रभाकर पणशीकर, शं. ना. नवरे, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. रामदास कामत, निर्मिती सावंत, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अनुपम खेर, स्पृहा जोशी, उमेश कामत, शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुकन्या मोने (कुलकर्णी), संजय मोने, आनंद इंगळे, नाट्य संमेलन अध्यक्ष जयंतराव सावरकर, दीपक करंजीकर, संगीतकार अशोक पत्की, गायक अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी, प्रसाद कांबळी, हार्दिक जोशी, अक्षदा देवधर यांची उपस्थिती लाभली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)