बारामती – आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांना पराभूत करणे हा आशावाद ठरेल. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजय मिळवून असे सांगून महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करणे शक्य नसल्याची एक प्रकारे कबुली सोमवारी (दि. 8) दिली.
बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर पत्रकारांशी चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार असा दावा मी कधीच केला नव्हता, कारण बारामतीमध्ये अजित पवार यांनी केलेली विकासकामे पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणे हा आशावाद ठरेल. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू, असे त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नितेश राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर केलेली चिखलफेक योग्य नसून कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. ही कामे चर्चेने आपण सोडवू शकतो असे नारायण राणे यांचा मला फोन आल्यावर त्यांना सांगितले असल्याचे त्यांनी नमूदा केले.
अजित पवारांना बरे वाटेल
मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे, त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो असे सांगत या माझ्या विधानामुळे अजित पवारांन यांनाही निश्चित बरं वाटेल, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जोडली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना निम्म्यानिम्म्या जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.