बारामती हरिनामाने दुमदुमली

– प्रमोद ठोंबरे

बारामती –
जनाई मुक्‍ताई सोबत माऊली।
नमा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली।।
भाळी चंदनाचा टीळा, माळ गळ्यात घातली ।
केला विठूचा कल्लोळ दिंडी पंढरी चालली।।
अशा प्रकारचे अभंग म्हणत महाराष्ट्राची दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात गुरुवारी बारामती येथील शारदा प्रांगणात मुक्‍कामी विसावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, नगरसेवक संतोष जगताप, नगरसेविका अनिता जगताप आदींनी बारामतीच्या वेशीवर कसबा येथे पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी स्वागतासाठी बारामतीकरांनी गर्दी केली होती.

पणदरे येथील एक दिवसाचा मुक्‍काम आटपून संत सोपानकाकांची पालखी दुपारी बारामतीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी सातव शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत केले. हरिनामाच्या जयघोषात पालखी सोहळा शारदा प्रांगणात रात्री आठ वाजता विसावला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शुक्रवारी (दि. 5) पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

पालखीचे विविध सामाजिक संस्था, विविध तरुण मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात आले. नीरारस्ता, कसबा येथील न्यू एकता तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक सागर काटे यांच्या हस्ते यावेळी वारकऱ्यांना फराळ तसेच बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असलेल्या या मंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही सेवा केली. यावेळी मंडळाचे महेश काळे, राम आगवणे, अतुल काटे, सागर ओहाळ, अण्णा भोरे, प्रशांत जंजिरे, डॉ. सचिन खांडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)