विधानसभेच्या जिल्ह्यातील चार जागा हव्यात : ना. खोत

सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील चार जागांची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे केली आहे. राज्यातून एकूण दहा जागांची मागणी करण्यात आली असून आपली मागणी रास्तच असल्याचे खोत यांनी सांगितले. रयत क्रांती संघटनेची राज्यात अनेक ठिकाणी प्रभाव असल्यामुळे दहा जागांची मागणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड-उत्तरसह, माण, कोरेगाव,

फलटण तर उर्वरित राज्यातून इस्लामपूर, शाहूवाडी पन्हाळा व नांदेड जिल्ह्यातील नायगाव, उस्मानाबाद आणि नाशिकधील सटाणा आणि विदर्भातील चिखली अशा मतदारसंघावर खोत यांनी दावा केला आहे. विधिमंडळ अधिवेशनाची सांगता होताच विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप- शिवसेना 135 जागा लढवणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर 18 जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपाने याआधीच जाहीर केलं आहे. भाजपबरोबर रयत क्रांती संघटना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे 18 जागांमध्ये 10 जागांची मागणी सदाभाऊ खोत यांनी केल्याने भाजपपुढे मित्रपक्षांच्या जागावाटपाची डोकेदुखी वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.