नवविवाहितेचा अपघाती मृत्यू

वडिलांबरोबर सासरी जाताना खड्ड्यातून पडल्यावर ट्रकने चिरडले

मेढा  – खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकने रस्त्यावर पडलेल्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेला चिरडले. भाग्यश्री गणेश जाधव (वय23) असे अपघातातील मृत विवाहितेचे नाव आहे. माहेरी आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जात असताना मेढा- सातारा रस्त्यावर सोमवारी हा अपघात घडला.

अधिक माहिती अशी, जावळी तालुक्‍यातील रिटकवली येथील सर्जेराव दादू मर्ढेकर यांच्या भाग्यश्री या मुलीचा मोरावळे (ता. जावळी) येथील गणेश जाधव यांच्या मे महिन्यातच विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री माहेरी आली होती. सोमवारी तिचे वडील सर्जेराव मर्ढेकर तिला आपल्या दुचाकीवरुन सासरी रिटकवली येथे सोडण्यासाठी निघाले होते. भाग्यश्री आणि तिचे वडील सर्जेराव हे जवळवाडी गावच्या कमानीनजीक आले असताना पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि पाठीमागे बसलेली भाग्यश्री रस्त्यावर पडली.

नेमके याचवेळी पाठीमागून आलेला ट्रकने भाग्यश्रीला चिरडले. या अपघातात वडिलांसमोरच भाग्यश्रीचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच भाग्यश्रीवर काळाने झडप घातल्याने रिटकवली, मोरावळेसह परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताप्रकरणी ट्रकचालक कासम उस्मान मुलाणी (वय 70, रा. बुध, ता. खटाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)