‘…बदलीसाठी कोणीही भेटू नये’

लाचखोरीच्या कारवाईनंतर आरोग्य विभागाने घेतली धास्ती

पुणे – बदलीसाठी लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. मात्र, या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये धास्ती भरली असून, नव्याने रूजू झालेल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर “बदली संदर्भात कोणीही भेटू नये’ असा फलकच लावण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला “काम काय आहे’ हे विचारूनच आत सोडले जात आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाने बहुतांश विभागात आरोग्य सेवा देण्याबाबत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अनेक वर्षानंतर हा बहुमान आरोग्य विभागाला मिळाला होता.

मात्र, जूनमध्ये एका बदली प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. तसेच हे षडयंत्र असल्याची उलटसुलट चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली.

दरम्यान, मागील आठवड्यात नवीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली आहे.

मात्र, मागील अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई लक्षात घेता, कोण कसे षडयंत्र रचेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे लाचेला कोठेही थारा न देता “बदली संदर्भात कोणीही भेटू नये, आदेशावरून’ असा फलक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आला आहे.

इतकेच नव्हे, तर आरोग्य विभागासह अन्य विभागातील अधिकाऱ्यांना कोणी भेटण्यासाठी आल्यावर, काय काम आहे’ याची विचारणा केली जाते. बदली, ठेकेदारी यासह अन्य शंकास्पद स्वरूपाचे कामे असल्यास व्यक्तींना सोडले जात नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)