गेल्या निवडणुकीतील 27 प्रकरणे अद्याप प्रलंबित

पिंपरी – निवडणुकीत होणाऱ्या हालचाली, पैसा व दारुचा बेसुमार पुरवठा, शस्त्राची होणारी तस्करी, गटा-तटातील मारामारी अशा अनेक गोष्टींवर पोलिसांना निवडणूक काळात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. त्यात मिरवणुका, प्रचारसभा यांचा बदोबस्त अशी सारी तारेवरची कसरत पोलिसांना या निवडणूक काळात करावी लागते. यापूर्वीच्या म्हणजे 2014 मध्ये मावळ लोकसभा निवडणुकी दरम्यान तब्बल 35 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील 27 प्रकरणे ही अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत. यंदा या निवडणुका स्वतंत्र आयुक्‍तालयाच्या अखत्यारीत पार पडणार आहेत त्यामुळे यंदा हा गुन्हेगारीची आकडेवारी घसरे का असा सवाल उपस्थित होत आहे.

2014 साली विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुका पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या अंतर्गत पार पडल्या होत्या. मात्र यावेळी निवडणूक स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या अंतर्गत पार पडणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आयुक्‍तालयाला भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यानी महासंचालक कार्यालयाच्या वतीने 14 गाड्याही आयुक्तालयाला दिल्या. यावेळी निवडणूक काळात किती मनुष्यबळ आवश्‍यक आहे, याचाही आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्‍तांशी चर्चा करत मागील निवडणुकीत शहरात कशी परिस्थिती होती याचाही आढवा यावेळी घेण्यात आला.

2014 पासून आतापर्यंत
2014 साली लोकसभा निवडणुकीत एकूण 35 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील एकाला शिक्षा झालेली आहे. सात जण सुटले आहेत तर 27 प्रकरणे ही अद्यापही प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीत 21 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एकालाही अद्याप शिक्षा झालेली नाही. तीन जण सुटले आहेत तर 17 प्रकरणे ही न्यायालयात प्रलंबित आहेत. शहरात मावळ, शिरूर या लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आज अखेरपर्यंत 231 ठिकाणी छापे मारत एकूण 34 हजार 120 लीटर दारू व 17 लाख 7 हजार 953 रुपये रक्कम जप्त केली आहे. यासाठी पोलिसांनी 12 ठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या आहेत. 2 हजार 416 कर्मचारी व अधिकारी हे सध्या बंदोबस्त करत असून मतदान व मत मोजणीच्यावेळी बाहेरुन कुमक मागवली जाणार आहे.

 

1736 गुन्हेगारांची यादी तयार

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तब्बल 1 हजार 736 गुन्हेगारांची यादी काढली असून गोपनीय विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार परिमंडळ एकमध्ये 873 तर परिमंडळ दोनमध्ये 863 गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. यातील 5 जणांवर तडीपारी व 5 जणांवर मोक्काची कारवाई करण्यात येणार आहे. तर यातील काही जणांना स्थानबद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)