पुणे – मद्यपी वाहनचालक ‘बुंगाट’

नियम तोडणाऱ्यांत 80 टक्के प्रमाण “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’चे

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. दोन्ही शहरांत मिळून साधारणपणे दररोज असे 60 गुन्हे न्यायालयात दाखल होत आहेत. विशेषत: त्यामध्ये मद्य पिऊन गाडी चालविण्याचे (ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह) प्रमाण तब्बल 80 टक्के आहे.

शिवाजीनगर न्यायालयात 1 मार्च 2018 ते फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत तब्बल 21 हजार 500 खटले दाखल झाले आहेत. त्यातील 11 हजार दावे निकाली काढण्यात आले असून, बेशिस्त वाहनचालकांकडून 21 कोटी 25 लाख 50 हजार 350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यातील सर्वाधिक दावे हे मद्य पिऊन वाहन चालविण्याचे आहेत. मद्य पिऊन निष्काळजीपणे वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, रॉंग साईडने जाणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील तडजोड आणि विनातडजोड पात्र दावे न्यायालयात दाखल होतात.

मद्य पिऊन वाहन चालविण्याचा गुन्हा हा तडजोडपात्र नसून, संबंधित वाहनचालकावर दोषारोपत्रसह खटला दाखल केला जातो. इतर प्रकरणे वाहतूक पोलिसांकडे दंड दिल्यानंतर जागेवर मिटविली जातात. गुन्हा कबूल नसल्यास ते प्रकरण न्यायालयात पाठवले जाते. मद्याच्या नशेत वाहन चालवताना पकडल्यानंतर होणारी कारवाई, निलंबित किंवा रद्द होणारा परवाना आदी कारवाया मद्यपींना अद्याप लागू पडल्या नसल्याचे नियमभंगाच्या वाढत चाललेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. दरम्यान न्यायालयात दाखल झालेले 95 टक्के ड्रंक अँड ड्राईव्हचे 95 टक्के खटल्यात कबुली दिली जाते. अशा वेळी अडीच हजार रुपये दंड आकारला जातो. तसेच या प्रकरणात सहा महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

मद्य पिऊन गाडी चालविणे चुकीचेच आहे. अशा खटल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, ते निकाली काढण्यासाठी एकच न्यायालय आहे. आणखी एक न्यायालय सुरू करणे गरजेचे आहे. नागरिकांनी मद्य पिऊन गाडी चालवू नये तसेच वाहतुकीचे नियम मोडू नयेत, यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे आवश्‍यक आहे.
– ऍड. संतोष खामकर, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)