खटाव भाजपच्या विजयानंतर पक्षांतर्गत हालचालीस वेग

संग्रहित छायाचित्र....

खटावमध्ये चर्चेला जोर, विधानसभेच्या उमेदवारीसाठी होणार स्पर्धा

वडूज – माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माण- खटाव मतदारसंघात सुमारे 23 हजाराहून अधिक मताधिक्‍क्‍याने विजय मिळवला. या विजयामध्ये या मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. आमदार जयकुमार गोरे व युवा नेते शेखर गोरे या दोन बंधूंचा मोठा दबदबा वाढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गोरे बंधूंबरोबरच भाजप शिवसेना युतीच्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत चांगलेच कष्ट घेतले. यामुळे माण खटाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी आतापासूनच मोठी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. माढ्यातील निकाल राष्ट्रवादीला मोठा धक्का देणारा ठरला. राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र, आमदार गोरे यांनी सतत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राष्ट्रवादीला अद्दल घडवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐनवेळी भाजपची वाट मोकळी करून देत उघड उघड पाठिंबा दिला.

तर राष्ट्रवादीत होणाऱ्या गटतटाच्या राजकारणातून शेखर गोरे यांनी ही रामराम ठोकून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिल्याने भाजपला चांगलेच मताधिक्‍य मिळाले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी असताना या निवडणुकीत आमदार गोरे भाजपकडे उमेदवारी मागणार का, की आहे त्याच चिन्हावर निवडणूक लढविणार असा प्रश्‍न उपस्थित केला जातोय. तर खिशातील पदरमोड करून जनतेच्या कामांसाठी तत्पर असलेल्या शेखर गोरे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्याचबरोबर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई हेही पक्षाचे प्रमुख दावेदार असणार आहेत.

तर गेल्या विधानसभेत शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढणारे रणजितसिंह देशमुख यांचे समर्थक उमेदवारीसाठी आशावादी आहेत. याशिवाय हा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाटेला गेला आहे. गेल्या विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर रासपच्या वाटेला ज्या काही निवडक जागा मिळणार आहेत त्यामध्ये होम ग्राउंड असणाऱ्या माणची जागा सोडण्यास पक्षाध्यक्ष महादेव जानकर व इतर सहकारी सहजासहजी राजी होणार नाहीत. अशा परिस्थितीत युतीच्या उमेदवारीसाठी मोठी तीव्र स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)