खा. लोखंडेंचे मताधिक्‍य 79 हजारांनी घटले

कोपरगाव, श्रीरामपूर, नेवाशातून मताधिक्‍यात घट : शिर्डीतून 53 हजारांनी वाढ 
नगर –
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिव लोखंडे यांना मिळालेल्या मताधिक्‍याच्या तुलनेत यंदा तब्बल 79 हजार 727 मतांची घट झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या करिष्म्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्‍यपेक्षा यंदा 53 हजार 362 मतांची वाढ झाली आहे. परंतू कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्‍यात यंदा मात्र झपाट्याने घट झाली आहे.

सन 2014 मध्ये सदाशिव लोखंडे यांची लढत कॉंग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबरोबर झाली होती. अवघ्या 17 दिवसांत लोखंडे खासदार झाले ते मोदी लाटेमुळे. यावेळी त्यांना सहा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळाले होते. अकोले, शिर्डी वगळता उर्वरित चार मतदारसंघातून मोठे मताधिक्‍य मिळाले. परंतू यंदा अकोलेमधून लोखंडे तब्बल 31 हजार 651 मतांनी पिछाडीवर राहिले. तर शिर्डीतून यावेळी मोठे मताधिक्‍य मिळाले.

अकोलेमधून गेल्यावेळी लोखंडे यांना 4 हजार 591 मतांची आघाडी मिळाली होती. परंतू यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्‍य मिळाले. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून यंदा लोखंडे यांना केवळ 7 हजार 725 एवढेच मताधिक्‍य मिळाले. गेल्यावेळी याच मतदारसंघातून त्यांना 26 हजार 270 मतांची आघाडी मिळाली. गेल्यावेळच्या तुलनेत 18 हजार 645 एवढे मताधिक्‍य घटले आहे. सन 2014 मध्ये कोपरगाव मतदारसंघातून लोखंडे यांना 55 हजार 627 एवढे सर्वाधिक मताधिक्‍य मिळाले होते. परंतू यावेळी त्यात 16 हजार 328 मतांची घट झाली आहे. यावेळी लोखंडे यांना 39 हजार 299 एवढे मताधिक्‍य मिळाले आहे. श्रीरामपूर मतदारसंघात देखील तीच स्थिती झाली आहे.

यावेळी लोखंडे यांना 21 हजार 458 मताधिक्‍य मिळाले आहे. गेल्यावेळी हे मताधिक्‍य 52 हजार 356 एवढे मिळाले होते. यावेळी त्यात तब्बल 30 हजार 898 मतांनी घट झाली आहे. नेवासा मतदारसंघात लोखंडे यांना गेल्या निवडणुकीत 51 हजार 422 मताधिक्‍य मिळाले होते. परंतू यावेळी त्या मोठी घट झाली आहे. यंदा त्यांना 19 हजार 734 एवढेच मताधिक्‍य मिळाले आहे. यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 31 हजार 688 मतांची घट झाली आहे. यावेळी विखेंच्या करिश्‍यामुळे लोखंडे तरले आहे. विखेंनी शिर्डीतून दिलेल्या 62 हजार 871 मताधिक्‍य मिळाले आहे. गेल्यावेळी या मतदारसंघातून लोखंडेंना केवळ 9 हजार 509 एवढेच मताधिक्‍य मिळाले होते. त्या निवडणुकीत विखेंनी वाकचौरे यांना मोठी मदत केली होती. त्यामुळे मताधिक्‍य घटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)