पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या एक दिवस आधी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीचे खापर महापालिकेने महावितरणवर फोडले आहे. महापालिकेने पावसाळ्यात वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी महावितरणला 18 जून 2019 रोजी परवानगी दिली होती. त्यानुसार ही झाडे छाटण्यात आल्याचे वृक्षप्राधिकरण समितीचे सचिव गणेश सोनुने यांनी मंगळवारी मुख्यसभेत सांगितले. तसेच, महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, ही झाडे तोडण्यासाठी आणि फांद्या काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कशी काय होती याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.
महाजनादेश यात्रा रविवारी दांडेकर पूल येथून सातारा रस्त्याकडे रवाना झाली. यावेळी पानमळा येथील पर्वती जलकेंद्र ते पु.ल देशपांडे उद्यानपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला पावसाळी वृक्षांची बेसुमार छाटनी करण्यात आली. त्याच, सुट्टीच्या दिवशी हा प्रताप करण्यात आल्याने ही झाडे कोणी काढली याची महापालिकेला माहितीही नव्हती.
खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी याबाबत थेट आयुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत, सोमवारी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनीही या प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन वस्तुस्थिचा अहवाल मंगळवारी सादर करण्याचे आदेश गणेश सोनुने यांना दिले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत कॉंग्रेसचे नगरसेवक अजित दरेकर यांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तसेच खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सोनुने यांनी खुलासा केला.
महापालिका प्रशासनाचा खोटेपणा उघड
महापालिका प्रशासनाकडून मुख्यसभेत करण्यात आलेला खुलासा खोटा असल्याचे समोर आले आहे. ही वृक्षतोड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने केल्याचे पालिकेकडून शनिवारी सांगण्यात आले. तसेच, ही झाडे तोडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तसेच वाहने होती. तर महावितरणला या झाडांचा अडथळा होता तर त्यांनी पावसाळा संपण्याची वाट का पाहिली याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही. याबाबत अतिरिक्त आयुक्तांकडे पुन्हा विचारणा केली असता, अद्याप वृक्ष प्राधिकरण समितीचा अहवाल आलेला नसल्याचे सांगत, यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.