विजयी मतांचा आकडा लाखांवरून हजारांवर येण्याची चर्चा
वासुंदे- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास उरलेले असताना बारामती मतदार संघात कोण बाजी मारणार…, या चर्चेला उधाण आले असुन कार्यकर्ते सोशल मिडियावर आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे करीत असून या मतदारसंघाच्या निकाला विषयी कार्यकर्त्यांत गाडी, तोळे, पोशाख जेवनावळी अशा पैंजा लागल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तगडे आव्हान म्हणून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देवून यशस्वीखेळी खेळली असल्याचा प्रत्यय येत आहे. यापूर्वी तीन लाखांचे लीड घेत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होत होता, याबाबत कार्यकर्त्यांचाही विश्वास दुणावला होता. परंतु, कुल यांच्या उमेदवारीनंतर मात्र या मतदार संघातील लढतीचे चित्रच बदलले असून आता लाखोंचे लीडच्या गोष्टी अगदी तीस हजारांच्या फरकाने कोणातही उमेदवार विजीय होऊ शकतो, इथं पर्यंत आल्या आहेत. याच कारणास्तव बारामती मतदारसंघात विशेषत: बारामती आणि दौंडमधील पक्ष कार्यकर्त्यांत तसेच राजकारणी धुरंधरात कोण विजयी होणार, याबाबत पैंजा लागल्या आहेत, याचे स्वरूप वेगवेगळे आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी निवडणुकीत मीच विजयी होणार असल्याचा दावे करीत आहेत, त्यामुळे सध्या सेना भाजपासह मित्र पक्षांच्या कार्यकर्तांचा उत्साह दुणावला आहे. तर, राष्ट्रवादी कार्यकर्तेही यंदा सुप्रिया सुळे या खासदारकीची हॅट्रीक करणारच, असल्याचे छातीठोक सांगत आहेत. विजयी मतांचा आकडा दोन्ही उमेदवारांत कमालीचा कमी असल्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अंदाज वर्तविले जात आहेत, यातूनच पैजांचे प्रमाण याच मतदार संघात अधिक असल्याचेही उघड आहे.