पिंपरी – गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे, असे केंद्रीय पर्यावरण तथा अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत तसेच विविध ठिकाणच्या विकास प्रकल्पांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.27) ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, ग प्रभाग अध्यक्ष बाबसाहेब त्रिभुवन आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला चांगल्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली, मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावा लागला. करोनाची दुसरी लाट आली आहे त्यामुळे सर्वांनी करोनाचे नियम पाळावे, असे आवाहन करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशातील ग्रामीण भागांमध्ये 2 कोटी घरे तर शहरी भागांमध्ये 70 लाख घरे बांधून देण्यात आली आहेत. लाभार्थींना मिळणारी स्वस्त घरे उत्तम असली पाहिजेत. विविध योजनांचा निधी गरीब जनतेच्या जनधन खात्यात थेट जमा होत असून याचा जनतेला विशेष आनंद होत आहे.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात घेऊन महापालिकेतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून पिंपरी चिंचवड शहराची ओळख उद्योग नगरी, कामगार नगरी बरोबरच पर्यटन नगरी म्हणून देखील होत आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे हा सर्वसामान्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. आपल्याला निवडून देणाऱ्या नागरिकांप्रती कर्तव्य बजावण्याची भावना शहरातील सर्व लोकप्रतिनिधींमध्ये आहे.
प्रधानमंत्री आवास योजना हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर केशव घोळवे यांनी आभार मानले.
या कामांचे ऑनलाइन उद्घाटन व भूमिपूजन
पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण तसेच बर्ड व्हॅली संगीत व प्रकाशमय कारंजे प्रकल्प, पिंपळे सौदागर ते पिंपरी या दरम्यान नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन समांतर पूलाचे काम आणि वाकड रोड रत्नदीप कॉलनी ते भिंगारे कॉर्नर या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.