Video : पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांना आग; 40 गाड्या खाक

पुणे,  – जंगली महाराज रस्त्यावरील डेक्कन वाहतूक विभाग कार्यालयाच्या पाठीमागील मैदानात उभ्या असलेल्या वाहनांना शनिवारी दुपारी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, रौद्र रुप धारण केलेल्या या आगीत दुचाकी, चारचाकीसह एकूण 35 ते 40 गाड्या जळाल्या आहेत. अग्निशमन जवानांच्या अथक प्रयत्नानंतर काही मिनिटांत आग विझविण्यात यश आले.

शहर वाहतूक विभाग आणि पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटकावून ठेवलेल्या गाड्या याठिकाणी पार्क केल्या जातात. येथे सुमारे सातशे ते आठशे गाड्या उभ्या आहेत. दरम्यान, शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास गाड्या उभ्या असलेल्या ठिकाणावरून धूर बाहेर येण्यास सुरवात झाली. परिसरातील नागरिकांनी याची माहिती शेजारीच असलेल्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना व अग्निशमन विभागाला दिली. मात्र, काही क्षणात आगीची तीव्रता वाढल्याने वाहनांनी पेट घेतला. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करेपर्यंत अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.

यामध्ये दूचाकी, चारचाकीसह टेम्पो, छोटा हत्ती, पोकलॅण्ड या वाहनांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करीत तीस ते चाळीस मिनिटांमध्ये पाण्याचा मारा करून आग अटोक्‍यात आणली. अग्निशमनचे विजय भिलारे, राजेश जगताप, सुनिल नाईकनवरे यांनी मदतकार्य केले. दरम्यान, वाहनांना आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी झोन एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.

पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटकावून ठेवलेली ही वाहने आहेत. वाहनामधील बॅटरी स्पार्क होऊन ही आग लागल्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबत तपास सुरू असून यानंतरच खरे कारण समजू शकेल. आगीमध्ये दुचाकी, चारचाकीसह सुमारे ते वाहनांचे नूकसान झाले आहे.
– प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, झोन एक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.