पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामधील पाण्यामधील पाइपलाइनमध्ये अंदाजे 30 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 30) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची खबर गावचे पोलीस पाटील नितीन मेंगडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात दिली. मेंगडेवाडी गावच्या हद्दीतील गवारी मळा येथे डिंभे धरणाचा उजवा कालवा जात असून या वस्तीमधील शेतकरी अनिल प्रभाकर गवारी हे कालव्या जवळून जात असतानाअंगात हिरवे रंगाचा फुल बाहयाचा कुर्ता व गुलाबी रंगाची सलवार असलेला अंदाजे 30 ते 35 वर्षीय वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह बाळासाहेब नाथा गवारी यांच्या पाइपलाइनला अडकलेल्या अवस्थेत पाहिला.
अनिल गवारी यांनी गावचे पोलीस पाटील नितीन मेंगडे यांना या घटनेची माहिती कळवली. पोलीस पाटील यांनी पारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी तो मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.
तर पोलिसांनी आकस्मिक मूत्यूची नोंद केली. पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद घोडके पुढील तपास करीत आहेत.