खंडाळा -केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सोम प्रकाश संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातून परतीचा प्रवास करताना त्यांनी शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यासोबत शिरवळ ते पुणे असा प्रवास करत आगामी लोकसभा निवडणूक व इतर विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंदर्भात सोम प्रकाश यांनी श्री. जाधव यांना दिल्लीत बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. एकांतात झालेल्या या चर्चेबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत शिवसेना तालुकाध्यक्ष भूषण शिंदे यांच्याशी या भेटीबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ” महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांशी संपर्क ठेवून विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने जिल्ह्यातील रखडलेल्या विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी बारकाईने लक्ष देत आहेत व यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी साताऱ्यासाठी मंजूर केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यावर युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केलेला आहे. हे सोम प्रकाश यांना सांगून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना- भाजप युतीमार्फत सामोरे जाऊन येणारे सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला.”
सातारा जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नवीन मोठे प्रकल्प आले पाहिजेत यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. यावर सोम प्रकाश यांनी पुरुषोत्तम जाधव यांना पुढील चर्चेसाठी दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले आह,े असेही यावेळी सांगण्यात आले.
===================