झिंदझी मंडेला यांचे निधन

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे वर्णभेदविरोधी लढ्याचे महानायक नेल्सन मंडेला आणि विनी मंडेला या दाम्पत्याच्या कन्या झिन्दझी मंडेला यांचे आज निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात आज सकाळी त्यांचे निधन झाले. दक्षिण अफ्रिकेतील अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या साऊथ आफ्रिकन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

झिंदझी मंडेला या 1985 साली आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर ओळखल्या जाऊ लागल्या. आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसने वर्णभेद विरोधी आपल्या चळवळीतून हिंसेला प्रोत्साहन देण्याचे बंद केल्यास नेल्सन मंडेला यांची सुटका करण्याची तयारी दक्षिण आफ्रिकेतील श्‍वेतवर्णीयांच्या सरकारने दर्शवली होती. मात्र झिंदझी मंडेला यांनी हा प्रस्ताव भर सभेमध्ये सपशेल फेटाळून लावला होता. त्यांच्या या भाषणाचे वार्तांकन सर्व जगभरातील वृत्तवाहिन्यांवरून करण्यात आले होते.

मृत्यूसमयी झिंदझी मंडेला या दक्षिण आफ्रिकेच्या डेन्मार्कसाठीच्या राजदूत होत्या. गेल्या वर्षी त्यांची दक्षिण कोरियाच्या राजदूत म्हणूनही नियुक्‍त झाली होती. त्यानंतर 5 वर्षे त्या अर्जेंटिनामध्येही राजदूत आणि मॉरिशसमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्‍त राहिल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.