पालघरमधील पोलिसाचा करोनामुळे मृत्यू

पालघर – पालघरमधील पोलीस नाईक पदावर काम करणारे जितेंद्र भालेराव (वय 38) यांचा सोमवारी सकाळी करोना मुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे वसईतील पोलिसांच्या मृत्यूची संख्या दोन झाली आहे.

पोलीस नाईक जितेंद्र भालेराव हे वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 20 जून रोजी त्यांना करोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नालासोपारा येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. याच पोलीस ठाण्यातील किरण साळुंके या पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मागील महिन्यात करोनामुळे मृत्यू झाला होता.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 135 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 103 जण करोनामुक्‍त झाले आहे. तर 30 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन पोलीस करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.