राजस्थानमधील कॉंग्रेसचे दोन नेते प्राप्तिकर विभागाच्या रडारवर?

करचुकवेगिरीवरून जयपूर, मुंबईसह चार शहरांत छापे

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने सोमवारी काही राजस्थानस्थित व्यावसायिक समुहांशी संबंधित ठिकाणांवर करचुकवेगिरीच्या आरोपावरून छापे टाकले. त्या कारवाईमुळे प्राप्तिकर विभागाच्या रडारवर राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेसचे दोन नेते असल्याची चर्चा सुरू झाली.

प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी जयपूर, कोटा, मुंबई आणि दिल्लीतील काही ठिकाणी छापे टाकले. जलविद्युत क्षेत्राशी निगडीत कंपनी आणि ज्वेलर्स शोरूमला लक्ष्य करून ती कारवाई करण्यात आली. राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड या कॉंग्रेस नेत्यांशी संबंधित समुहांवर छापे टाकण्यात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.

मात्र, प्राप्तिकर विभागाकडून त्याबाबत तातडीने कुठली माहिती देण्यात आली नाही. राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष उफाळून आला असतानाच ते छापासत्र घडले. त्यामुळे कारवाईच्या वेळेबाबत कॉंग्रेसकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्राप्तिकर विभाग, ईडी आणि सीबीआय या यंत्रणा भाजपचे विभाग म्हणून कार्य करत आहेत. मात्र, अशा छापासत्रांमुळे राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार कोसळणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.