Pakistan – आसिफ अली झरदारी यांनी आज पाकिस्तानचे १४ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी अध्यक्षीय प्रासादामध्ये त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.
झरदारी यांच्या शपथविधीच्या समारंभाला पंतप्रधान शेहबाझ शरीफ, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि परदेशी उच्चायुक्त उपस्थित होते.
डॉ. आरिफ अल्वी यांच्याकडून झरदारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. डॉ. अल्वी यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३ मध्येच संपला आहे. त्यापेक्षाही पाच महिने जास्त उलटून गेले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असलेले झरदारी कालच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते.
ते अध्यक्षपदासाठी सत्तारुढ पीएमएल-एन, पीपीपी आणि एमक्यूएम आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी पीटीआय पुरस्कृत सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलचे उमेदवार महमूद खान अचकझाई यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
संसद आणि चारही प्रांतांमधील सत्तारुढ आघाडीची मिळून त्यांना ४११ मते मिळाली होती. तर अचकझाई यांना पीटीआय आणि एससीआयची मिळून १८१ मते मिळाली होती.
अध्यक्षपदाची दुसर् यांदा जबाबदारी…
झरदारी दुसर् यांदा पाकिस्तानचे अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी २००८ ते २०१३ दरम्यान ते पाकिस्तानचे अध्यक्ष होते. १९५५ मध्ये जन्मलेले झरदारी यांचे सर्व शिक्षण कराचीमध्ये झाले आहे.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. बेनझीर भुट्टो यांची डिसेंबर २००७ मध्ये हत्या झाली, त्यानंतर पीपीपी पक्षाची जबाबदारी झरदारी यांच्याकडे आली होती.