सिंहगड रस्ता – सिंहगड रस्त्यावरील वडगांव पुलावर दुपारच्या वेळेत साधारण तिशीतील युवक कठड्यांवर चढला. अंगावरचा शर्ट काढून बराच वेळ तो कठड्यावर बसून होता. त्यानंतर त्या युवकाने जाणाऱ्या-येणाऱ्यांना जोरजोरात आवाज देणे सुरू केले आणि उडी मारण्याच्या तयारीत होता. त्यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करीत त्याला खाली उतरण्यास सांगितले. परंतु, तो ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हता.
थोड्याच वेळात अभिरुची पोलीस स्टेशनमधून मार्शल आले आणि त्यांनी त्याला वडगाव पूलावर जाऊन सावधपणे खाली उतरवले. नागरिक तसेच पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या युवकाला पुलावरून उडी मारण्यापासून परावृत्त करण्यात यश आले. त्याला खाली सुरक्षितपणे उतरल्यावर जमलेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
“सदर युवक हा बोलण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हता. तो काय बोलत होता त्याचे त्यालाच कळत नव्हते. नावही सांगता येत नव्हते. त्याचे समुपदेशन करून त्याला सामाजिक संस्थेमध्ये पाठवण्यात आले आहे, ” – श्रीधर खडके, सहायक उपनिरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, अभिरुची