पिंपरी – केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे हस्ते उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. त्या अगोदर पोलिसांनी वाहतुकीबाबत रंगीत तालीम घेतली. परंतु नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेस ही रंगीत तालीम घेण्यात आल्याने नागरिकांचे हाल झाले.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दोन ते तीन दिवसांपासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत. कार्यक्रम रविवारी सुट्टीच्या दिवशी होणार असून पोलिसांनी शनिवारी (दि. 5) चिंचवडगाव परिसरात सकाळच्या सत्रातील शाळा सुटण्याच्या वेळेत रंगीत तालीम घेतली. त्यात चिंचवडकडे सर्व मार्गांनी जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. सुरवातीला नेहमीचीच वाहतूक कोंडी आहे, असे वाटले. त्यामुळे 15 ते 20 मिनिटे वाहनचालक पावसात देखील शांतपणे उभे होते. त्यानंतर काही पोलिसांच्या मोठ्या व्हॅन सायरन वाजवत गेल्या. त्यामुळे कोणी मंत्री जात आहेत, असे समजून थांबून राहिले. मात्र, त्यानंतरही कित्येक वेळ पुढील सर्व रस्ता रिकामा असतानाही रोखून धरल्याचे मागील वाहनचालकांना समजत नव्हते. पाऊण तास झाला तरी, चित्र स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांनी पुढे जाऊन चौकशी केली असता रविवारच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू असल्याचे समजले.
पालक, विद्यार्थी त्रस्त
सकाळच्या सत्राच्या शाळा सुटण्याची आणि दुपारच्या सत्राची शाळा भरण्याच्या वेळीच ही रंगीत तालीम करण्यात आली. या वेळेत विद्यार्थी, शाळांच्या व्हॅन, सोडवायला, घ्यायला येणारे पालक व पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्याच वेळी ही रंगीत तालीम करण्यात आली. शाळेतून घरी जाणाऱ्या अनेक लहान मुलांना भूक लागली होती. तर, काही मुले गाडीवरच झोपी जात होती. त्याने पालक व विद्यार्थी त्रस्त झाले होते.
हॉर्न वाजवून संयम संपल्याचा दिला संकेत
सुमारे 35 ते 40 मिनिटे नागरिकांना रंगीत तालमीसाठी थांबवल्याचे लक्षात आले. त्या वेळी थांबलेल्या वाहनचालकांचा पारा चढला. त्यांनी सलग हॉर्न वाजविण्यास सुरवात केली. हॉर्नचा सतत येणाऱ्या आवजातून नागरिक आपला त्रागा, नाराजी व्यक्त करत होते. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी वाहने सोडण्यात आली.
येथील रस्ते बंद होते
वाल्हेकरवाडीकडून चिंचवडकडे जाणारा रस्ता
जैन शाळेकडून चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडीकडे जाणारा रस्ता
वाल्हेकरवाडीकडून थेरगावकडे जाणारा रस्ता
डांगेचौक, थेरगावकडून चिंचवड, वाल्हेकवाडीकडे जाणारा रस्ता