वाल्हे : येथील करोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 19 जणांच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी (दि. 29) रात्री उशीरा आला. त्यात एका 25 वर्षीय युवक पॉझिटिव्ह तर 18 जण निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
वाल्हे येथील वाल्मिकी नगरमधील एका युवकास करोना झाल्याने वाल्मिकी नगरमधील प्रत्येकाची तपासणी ग्रामपंचायत, करोना दक्षता समिती, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक आदींच्या मदतीने तातडीने सुरू केल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली. याप्रसंगी आरोग्य सेवका धनश्री राऊत, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, मोहन ढोबळे आरोग्य केंद्रचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
या युवकाच्या संपर्कातील 7 हाय तर 23 लो रिस्क कॉटॅक्टमधील आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी दिली.
वाल्हे येथे करोनाचा तिसरा रूग्ण सापडल्याने ग्रामस्थांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी. घाबरुन न जाता मास्क वापरावेत व श्वसनाचा त्रास, सर्दी, खोकला, ताप यापैकी काही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय आरोग्य सेवेशी संपर्क साधावा.
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष, जिल्हा बॅंक, पुणे