कराड – न्यूझीलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दिलीप सदाशिव धोकटे (रा. विरवडे, ता. कराड) या युवकाची तब्बल 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेव्हिड फित्झगेराल्ड व एडन झेव्हियर नावाच्या संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दिलीप धोकटे हा गेली सात वर्षे नायजेरियन कंपनीत “सप्लाय चेन मॅनेजर’ म्हणून ऑनलाइन काम करत आहे. त्याने नोकरीसंदर्भात एका वेबसाइटवर आपला बायोडाटा टाकला होता. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी त्याच्या ई-मेल आयडीवर आलेल्या मेलवर, न्यूझीलंडमधील एका कंपनीतील नोकरीसाठी विचारणा करून, कागदपत्रे मागवण्यात आली. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी त्याला फोन आला. समोरील व्यक्तीने डेव्हिड फित्झगेराल्ड असे नाव सांगून दिलीपची मुलाखत घेतली.
त्याला कंपनीचे जॉबलेटर आणि न्यूझीलंड सरकारचा सही-शिक्का असलेले परवानगी पत्रही पाठवण्यात आले. डेव्हिडने दिलीपला पुढील कार्यवाहीसाठी नवी दिल्लीत न्यूझीलंडच्या दुतावासातील एडन झेव्हियर नामक व्यक्तीशी संपर्क करायला सांगितले. एडनशी संपर्क झाल्यानंतर त्याने न्यूझीलंड सरकारची कायदेशीर नोकरी असून, ही नोकरी तुलाच मिळणार, अशी खात्री दिलीपला दिली. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी संशयितांनी दिलीपकडून तब्बल 27 लाख 82 हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले.
मात्र, डिसेंबर महिनाअखेरपर्यंत संबंधितांकडून नोकरीबाबत टोलवाटोलवी आणि वारंवार पैशाची मागणी होत असल्याने दिलीपला संशय आला. त्याने नवी दिल्लीत न्यूझीलंडच्या दुतावसाशी संपर्क साधला असता, त्याला न्यूझीलंडच्या इमिग्रेशन कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दिलीपने संपर्क साधला असता, अशी कोणतीही कार्यवाही न्यूझीलंड सरकारकडून झाली नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर दिलीप धोकटेने फिर्याद नोंदवली. पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करत आहेत.