पाचगणी – वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर, ता. महाबळेश्वर गावाच्या हद्दीत भररस्त्यात रेनॉ डस्टर (क्र. एमएच-02-डब्ल्यू-6997) या कारने सोमवारी दुपारी अचानक पेट घेतला. या कारमध्ये मुंबईतून पर्यटक महाबळेश्वरला निघाले होते. कार अचानक पेटल्यावर प्रसंगावधान राखून चौघेही गाडीतून बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; परंतु शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
मुंबईतील चार पर्यटक रेनॉ डस्टर गाडीतून वाई-महाबळेश्वर रस्त्याने सोमवारी दुपारी निघाले होते. दांडेघर गावच्या हद्दीत आल्यावर दुपारी 2.30 च्या सुमारास या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने चौघेही गाडीतून बाहेर पडल्याने ते बचावले. आगीच्या ज्वाळा उंच उसळत होत्या. या घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांच्यासोबत “एसओएस’ टीमचे सदस्य होते. पाचगणी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंबदेखील घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. गाडीवर पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत अर्धी कार जळाली होती. या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या गाडीमध्ये तीन पर्यटक वयस्कर असून, ही कार हरिष मजवानी यांची होती.
==============