सोरतापवाडी/लोणी काळभोर – सायकल खेळत असताना तोल गेल्याने बेबी कालव्यात पडून अल्पवयीन बहीण – भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. 18) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
जागृती दत्तात्रय ढवळे (वय 6), शिवराज दत्तात्रय ढवळे (वय 3, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ देऊळगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू पडलेल्या बहीण भावंडाची नावे आहे.
जागृती आणि शिवराज हे दोघे सायकलवर बसून कालव्यावरील भरावावर खेळत होते. यावेळी जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज पाठीमागील सीटवर बसला होता. खेळत असताना जागृतीचा तोल गेला. त्यामुळे दोघेही सायकलसह कालव्यात पडले. बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नाहीत म्हणून कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात पाहणी केली. त्यावेळी कालव्यात सायकल तसेच चपला आढळून आल्याने दोन्ही बालके कालव्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
स्थानिक युवकांनी कालव्यात उतरून सुमारे दोन – तीन किलोमीटर कालव्याचे पात्र तपासले. परंतु अतिदाबाने पाण्याचे आवर्तन सोडल्याने मुलांचा शोध घेणे अवघड जात होते. शोधमोहीम सुरू असताना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रात्री अकराच्या सुमारास दोन्ही बालके जलपर्णीत अडकल्याने निदर्शनास आले. उपचारासाठी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत निरागस बालकांवर काळाने झडप घातल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. बहीण भावाचा मृत्यू झाल्याने सोरतापवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.