वाठार स्टेशन -महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी विकण्याच्या बहाण्याने परमिल कुमार आणि विकास पटेल या भामट्यांनी भाडळे, ता. कोरेगाव येथील अमित विश्वास मोहिते या युवकाची गुगल पे अकाऊंटवरून अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भाडळे येथील अमित मोहिते हे सोमवारी (दि. 27) आपल्या मोबाइलवरून फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट पाहत होते. त्यावेळी “कार बेचो’ या फेसबुक अकाऊंटवर महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी विक्रीची पोस्ट त्यांनी पाहिली. त्यांनी गाडीची चौकशी करण्याकरिता मोबाइलवरून पुढील व्यक्तीशी संपर्क साधला. त्यावेळी समोरील व्यक्तीने परमिल कुमार असे नाव सांगितले.
मी सैन्यदलात नोकरीस आहे, असे सांगून त्याने अमित मोहिते यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या भामट्याने बोलबच्चनगिरी करून मोहिते यांच्याकडून गाडीच्या व्यवहारापोटी गुगल पे अकाऊंटवरुन स्वतःच्या पे अकाऊंटवर दोन लाख 48 हजार 715 रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले.
या व्यवहारात आपली फसवणूक झाली असून त्यामध्ये परमिल कुमार याच्यासोबत विकास पटेल याचा सहभाग असल्याचे लक्षात येताच मोहिते यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सपोनि स्वप्निल घोंगडे यांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.