पिंपरी – खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये लुटणाऱ्या सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली.
कुणाल, संदेश ऊर्फ संजय जाधव, प्रविण सुकळे, अनिल वाकुडे, विजय घाटे, अशिषकुमार वरखडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. चेतन रामभाऊ मांडले (वय 20, रा. एकता कॉलनी, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 3) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी मांडले यांच्या घरात घुसले. आम्हाला खर्चासाठी पैसे दे, असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली. मात्र मांडले यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी मांडले यांना मारहाण करीत आषिशकुमार वरखडे यांच्या खोलीत नेले. तिथे लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करीत मांडले यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र अहिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.