गोरखपूर- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आज गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते तेथे उपस्थित होते.
निवडणुकीचा अर्ज भरायला जाण्यापूर्वी झालेल्या एका सभेत भाजपने शक्तिप्रदर्शनही केले. यावेळी बोलताना अमित शहा यांनी आदित्यनाथ यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. ते म्हणाले की, आदित्यनाथ यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात उत्तर प्रदेशला माफियांच्या तावडीतून मुक्त केले आहे. योगींनी 25 वर्षांनंतर उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य स्थापन केले आहे, असेही अमित शहा यांनी नमूद केले.
प्रत्यक्ष अर्ज भरण्यापूर्वी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात पूजा व हवन केले. ते याच मंदिराचे महंतही आहेत. या आधी अयोध्या किंवा वाराणसीमधून योगींना उतरवण्याचा भाजपचा विचार होता. पण ऐनवेळी पक्षाने तो सोडून दिला. गोरखपूर मतदारसंघात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे निवडणूक रिंगणात उतरले असून समाजवादी पक्षाने अजून आपला उमेदवार तिथे जाहीर केलेला नाही.