उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ सरकारने दिवाळीच्या सणापूर्वी राज्यातील जनतेला भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे. निवडणुकीपूर्वी वर्षातून दोन वेळेस मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्ण करणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरधारकांना सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.
योगी सरकार दीड वर्षानंतर मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन पूर्ण करणार आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी या योजनेशी संबंधित मार्गदर्शक सूचना विभागीय अधिकाऱ्यांना जारी केल्या आहेत. या योजनेसंदर्भातील प्रस्तावावर मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
उत्तर प्रदेशमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 75 लाख गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर या गॅस कनेक्शनधारकांच्या खात्यावर मोफत सिलिंडरचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीद्वारे पाठवले जाणार असून त्यासाठी तयारीही सुरू झालीआहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातून दोनदा मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. हा गॅस सिलिंडर दिवाळी आणि होळीच्या सणाला दिला जाणार आहे, जेणेकरून कुटुंबांचा आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी 3300 कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. योगी सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला नक्कीच फायदा होऊ शकतो.