यवत(प्रतिनिधी) – एका प्रवाशाला मारहाण करीत यवत गावच्या हद्दीमधून 24 लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. याबाबत प्रज्योत रमेश शिंदे (वय 25, रा. कोऱ्हाळे, ता. फलटण, जि. सातारा), सध्या काळबादेवी मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सविस्तर माहिती अशी की, शिंदे हे गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या दरम्यान पुणे – सोलापुर महामार्गावरील यवत गावाच्या हद्दीत इंदापूर – स्वारगेट बस (एमएच 13 सीयू 7246) मधून पुण्याकडे निघाले होते. बस यवत बसथांब्यावर थांबली असता दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती बसमध्ये चढले. त्यातील एकाने तू मुलींची छेड काढतो काय, असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर एकाने पार्सल बॅग पकडलेल्या हातावर लाथा मारून ती पार्सल बॅग हिसकावुन बसमधुन पळ काढला.
यामध्ये 24 लाख 32 हजार 750 रुपयांची रोख रक्कम होती. असे प्रज्योत शिंदे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच दुचाकीला अडकवलेली 30 लाखांच्या दागिन्यांची पिशवी दौंड शहरातील शिवाजीनगर चौकात घडली. ही घटना ताजी असतानाच प्रवाशाला मारहाण करुन यवत येथील भरचौकातून घडल्याचे दौंड तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील चोरट्यांचा डाव पोलीस प्रशासन कधी मोडून काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.