पिंपरी, (प्रतिनिधी) – तीन लाख रुपयांची रोकड ठेवलेली बॅग एका चोरट्याने पळवून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २८) सकाळी अकरा वाजताच्या सुमारसा बँक ऑफ इंडियाच्या समोर, पिंपरी येथे घडली.
राकेश सेवनदास पारवानी (वय ५२, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर पाळत ठेवली.
फिर्यादी पैसे काढून बँकेच्या बाहेर आले आणि गाडीत बसले. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस पैसे खाली पडले आहेत, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. फिर्यादीने गाडीत तीन लाख रुपयांची रोकड ठेवलेली बॅग घेऊन चोरटा पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.