कराड – श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित उपस्थित राहणार असून इंद्रजित देशमुख सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), समन्वयक प्रा. अशोक चव्हाण व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली. या उपक्रमामध्ये अनंत दीक्षित, ना. धो. महानोर, सदानंद मोरे, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, शांतीलाल मुथा व इंद्रजित देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान देतानाच स्व. चव्हाणसाहेबांच्या विचारांचा जागर करणारे व्यक्तीमत्व म्हणून खा. पाटील यांची समाजामध्ये ओळख आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास शहरातील संस्थेचे सभासद व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे.