बीजिंग,(चीन) – तैवानला चीनबरोबर पुन्हा एकत्र करण्यावर चीन ठाम असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. नववर्षानिमित्त देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये जिनपिंग यांनी एकिकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. चीन तैवानला पुन्हा सामील करून घेईल, असे ते म्हणाले.
मात्र या एकिकरणासाठी कोणतेही निश्चित वेळापत्रक त्यांनी सांगितले नाही. तैवानमध्ये १३ जानेवारीला अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच जिनपिंग यांनी तैवानच्या एकिकरणाबाबत उघड वक्तव्य केले आहे.
तैवानमधील सत्तारुढ डेमोक्रॅटिक पीपल्स पार्टीचे उपाध्यक्ष विल्यम लाय हे अध्यक्षपदाचे मुक्य दावेदार आहेत. मात्रचीनकडून त्यांना विभाजनवादी म्हणून संबोधले जाते आहे. विल्यम लाय आणि तैवानच्या विद्यमान अध्यक्षा त्साई इंग वेन यांच्यावर चीनला चिथावणी देण्याचा आरोप केला जातो आहे.
तैवानला एक ना एक दिवस चीनबरोबर विलीन करून घेण्याच्या जिनपिंग यांच्या ठाम भूमिकेमुळे चीनकडून लष्करी बळाचा वापर करून तैवानला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता बळावली आहे. तैवानने हा धोका ओळखला असून चीनच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची तयारी देखील सुरू केली आहे.
तैवान आणि चीनचा संबंध
चीन आणि तैवान १९४९ मधील यादवी युद्धादरम्यान वेगळे झाले. मात्र चीनकडून अजूनही तैवानला आपलाच भूभाग म्हणून संबोधले जाते आहे. तैवानच्या तंत्रज्ञान आधारीत अर्थव्यवस्थेला ताब्यात घेण्याची चीनची खूप पूर्वीपासून इच्छा आहे,
जरी तैवानचे आपल्या बेटावर स्वतःचे नियंत्रण आहे. तरी चीन नियमितपणे बेटाच्या जवळच्या हवाई क्षेत्रात लढाऊ विमाने आणि तैवानच्या पाण्याजवळील युद्धनौका पाठवत आहे.