लोणी काळभोर -काही लोकांनी महिलेच्या फोटोचा वापर करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकून तो फोटो सोशल मीडियात व्हायरल करून बदनामी केली. या महिलेने संबंधित अनोळखी व्यक्तिंविरोधात लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही महिला एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये बाल लैंगिक शोषण व महिला सबलीकरणाबाबत काम करते. तसेच दुर्बल महिला व मुली यांना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करते. त्यांनी सोशल मीडिया, वर्तमानपत्र व इतर माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील एका तरुणाच्या झालेल्या खुनाबाबतीत वाचले होते. त्यानंतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन काही अनोळखी लोकांकडून एका समाजाच्या महिलांना टार्गेट करून त्यांचे आक्षेपार्ह व्हीडिओ व अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेले गाणे हे सोशल मीडियात व्हायरल करून बदनामी करीत असल्याचे पाहिले होते; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
सोमवारी (दि. 15) दुपारी घरी मोबाईल पाह पाहत असताना काही लोकांनी त्यांच्या फोटोचा वापर करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. हे आक्षेपार्ह फोटो कोणत्या लिंक वरून आलेले आहेत, ते पाहिले. समाजामध्ये बदनामी केली म्हणून संबंधित अनोळखी व्यक्तिंविरुद्ध त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंग, माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.