पळसदेव -येथील ग्रामदैवत पळसनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय विजेता पै. गणेश जगताप विरुद्ध राष्ट्रीय विजेता पै. सिकंदर शेख यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत सिकंदर शेख याने गणेश जगतापला एकच्याक डावावर आसमान दाखवत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
येथील पळसनाथ मंदिरामध्ये पहाटे देवाची महापूजा, आरती करण्यात आली. यानंतर देवदर्शनासाठी ग्रामस्थ भाविकांनी उपस्थिती लावली. सायंकाळी देवाच्या छबिन्याचे व कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या मैदानात लहान- मोठ्या सुमारे दिडशे कुस्त्या पार पडल्या.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जीवन गौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ पठारे, जिल्हा बॅंकेचे संचालक आपासाहेब जगदाळे, रावसाहेब मगर, उत्तमराव फडतरे, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, मारुती मारकड आदींनी कुस्ती आखाड्यास भेट दिली. नेमलेल्या प्रमुख सहा कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.