पुणे -देशाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी केली जाणारी तरतूद अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे या सेवांचा दर्जा आणि व्याप्ती वेगाने सुधारण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्र यांची भागीदारी व्यवहार्य ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ. विजय केळकर यांनी केले.
“पुणे ऑबस्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी’ च्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात डॉ. केळकर, “फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी’ज च्या अध्यक्ष डॉ. एस. शांता कुमारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. पराग बिनीवाले यांनी या समारंभात सोसायटीचे 2022-23 या वर्षासाठीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. पुणे सोसायटी च्या मावळत्या अध्यक्ष डॉ. सुनीता तांदूळवाडकर तसेच त्यांच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला खासगी क्षेत्राकडून तज्ज्ञ सहभाग, अर्थिक बळ, कार्यक्षमता, नवी दृष्टी आणि तंत्रज्ञान मिळेल तर सरकार प्रारंभिक भांडवल पुरवेल तसेच या सेवांसाठी नियम तयार करणे आणि आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे या जबाबदाऱ्या उचलू शकेल, असे डॉ. केळकर म्हणाले.
स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, डॉक्टरांवर होणारे हल्ले या अनिष्ट गोष्टी रोखण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी कृतिशील झाले पाहिजे. सरकारी नियम आणि कायदे आहेतच पण त्यांच्या जोडीला आपणही काम केले पाहिजे, असे मत डॉ. शांता कुमारी यांनी व्यक्त केले.
पुणे सोसायटीचे बत्तीसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर येत्या वर्षभरात कोणते उपक्रम हाती घेतले जातील याची रूपरेषा डॉ. बिनीवाले यांनी सादर केली. पुणे सोसायटीचे नवे सचिव डॉ. आशिष काळे यांनी आभार मानले.